दोन बस, दोन ट्रक, एक जीप असा वाहनांचा ताफा, कलाकारासह ११० आसामी असा लवाजमा घेत गावोगावी फिरणारा मराठी मातीचा अस्सल असा काळू – बाळू तमाशा नोटबंदीमुळे आíथक संकटात सापडला आहे. लोकांकडे पैसेच नसल्याने रोजच्या खेळाला होणारी गर्दी ५० टक्क्यांनी घटली आहे. कवलापूरच्या काळू-बाळू लोकनाटय़ाची ही वाटचाल आज तरी ‘बिन पशाचा तमाशा’कडे असून िवचवाचे बिऱ्हाड चालवायचे कसे, असा सवाल फडमालकांना पडला आहे.

जिल्ह्यातील कवलापूरचे लव-कुश लोकनाटय़ मंडळ हे अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारे नाव. ‘जहरी प्याला’ या वगनाटय़ातील काळू-बाळू या पात्रामुळे या लोकनाटय़ मंडळाचे नाव काळू-बाळू असे नामकरण लोकांनीच केले. या अस्सल मराठमोळ्या लोककलेला लोकाश्रयही मिळाला. विनोदाचा ताजेपणा, राजकीय भाष्य, टीका-टिपणी आणि तेही गावच्या बोलीत असल्याने ग्रामीण भागातील प्रेक्षक निखळ करमणुकीसाठी आजही तमाशा पाहतो.

दरवर्षी दसऱ्यादिवशी गावच्या पारावर मोफत तमाशा करून मुलुखगिरी सुरू करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेपर्यंत ही मुलुखगिरी सुरू असते. यंदाही काळू बाळूने मुलुखगिरी सुरू केली. मात्र अचानक ९ नोव्हेंबरला नोटा बंदी जाहीर झाली आणि तिकीटबारीवरील रांगा बँकांच्या दारात पोहोचल्या. याचा सर्वाधिक फटका गावोगावच्या यात्रांना जसा बसला तसाच करमणुकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांनाही बसला.

याबाबत काळू-बाळूचे फड संचालक संपत श्यामराव खाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, दररोज हजार बाराशे प्रेक्षक आले तर आम्हाला ना नफा- ना तोटा असा खेळ करणे परवडते. मात्र सध्या प्रति माणशी ६० रूपये तिकीट असल्याने प्रेक्षकांकडे सुटे पसे नसल्याने प्रेक्षकांची संख्या ७०० ते ८०० वर आली आहे. यामुळे गल्ला कमी होत असून खर्च मात्र नेहमीचा आहे तो आहेच.

या फडात कलाकारांसह ११० आसामी असून या सर्व लोकांची जेवणाची व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था करण्याबरोबरच पगारही द्यावा लागतो.

जरी खेळ बंद ठेवला तरी हा खर्च करावाच लागत असून रोजचा खर्च ५० ते ६० हजाराच्या घरात आहे. यामुळे सध्या तरी नोट बंदीमुळे रोजचा घाटा २० ते २५ हजाराचा बसत आहे. काही वेळा स्थानिक यात्रा समिती खुल्या मदानात खेळ करण्याचा आग्रह करीत आहे. यामुळे तिकिट खिडकीवर अडचण नसली तरी चलनाची अडचण भेडसावत आहेच.

Story img Loader