ठाकरे गटाचे युवानेता आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणले होते. मुंबईच्या उष्ण वातावरणात पेंग्विन टीकू शकणार नाहीत, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. तसंच, मुंबईसारख्या शहरांत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत, अनेक पायाभूत सुविधांपासून मुंबईकर वंचित असताना पेंग्विनवर खर्च करण्याची गरज काय? असा सवाल विरोधकांकडून विचारला गेला होता. त्यावरून आदित्य ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते. यावर त्यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन संबोधून त्यांची खिल्ली उडवली जाते. याबाबत त्यांना आज विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले की, “सहा वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत पेग्विंन घेऊन आलो. कोणत्याही प्राण्याची जगभरातून आयात करायची असते तेव्हा मोठा पत्रव्यवहार वगैरे करावा लागतो. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांना भारतात आणलं होतं. आज पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालय नफ्यात आलं आहे. दरदिवशी ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा. आमच्या पेंग्विनने मुंबई पालिकेला ५० खोक्यांचं उत्पन्न मिळवून दिलं. पण जे पळून गेले ते स्वतःसाठी ५० खोके घेऊन पळाले.”

एवढंच नव्हे तर, “मी पेंग्विनसारखं चालतो की सराकरमधील कोणी चालतं ते पाहा”, असा मिश्किल टोलाही त्यांनी कोणाचंही नाव न घेता लगावला.”

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार का?

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सुरुवातील मिश्किल उत्तर दिलं. त्यावर त्यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देण्याची विनंती मुलाखतकाराने केली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “पक्ष मला जी जबाबदारी देईल ती निवडणूक मी लढवेन. मी प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर करतो, त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल.”

एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत माहित होतं का?

“बंडखोरीच्या महिनाभर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का हे विचारलं होतं. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून विविध माध्यमातून ही माहिती समोर येत होती की ते पक्षात बंडखोरी करण्याच्या वाटेवर आहेत. तसंच, उद्धव ठाकरे आता रुग्णालयात आहेत, ते पक्ष चालवू शकतात का? असा प्रचारही त्यांनी केला. एखाद्या माणसांचं मन किती काळं असू शकतो. ज्या माणसाने आपल्याला घडवलं, जेव्हा तो रुग्णालयात असतो त्याचा फायदा घेऊन हे स्वतःचं करिअर बनवतात. ज्यावेळी त्यांना विचारलं तेव्हा ते रडू लागले आणि म्हणाले ते तुरुंगात टाकतील. तुरुंगात जाण्याचं हे वय नाही, मुलालाही तुरुंगात टाकतील. असं बोलून ते पळून गेले (बंडखोरी केली). ते पळाले कारण ते घाबरले. जे धीट होते, प्रामाणिक होते ते पक्षासोबत राहिले.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 crore profit due to penguins but what happened to cheetahs aditya thackerays question sgk
Show comments