ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार राहुल कूल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राहुल कूल यांनी भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यानंतर आता ठाकरे गटाने दौंड तालुक्यातील वरवंड येथे’पोलखोल’ सभेचं आयोजन केलं आहे. खासदार संजय राऊत ही सभा घेणार असून ते वरवंडच्या दिशेने रवाना झाले.
पण संजय राऊतांच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर वरवंडमध्ये कलम-१४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संजय राऊत वरवंडच्या दिशेनं जाताना त्यांना पोलिसांनी दोनदा अडवलं. गाडीतून खाली उतरून चर्चा केल्यानंतर पोलिसांनी संजय राऊतांना पुढे जाऊ दिलं.
पण’पोलखोल’ सभेपूर्वी संजय राऊत भीमा पाटस कारखान्याच्या माजी चेअरमनच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी भीमा पाटस कारखान्यावर गेले असता तिथेही पोलिसांनी संजय राऊतांना अडवलं. खासदार असूनही त्यांना कारखाना परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. अखेर स्थानिक कारखाना सदस्याने मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी संजय राऊतांसह काही कारखाना सदस्यांना कारखाना परिसरात प्रवेश दिला.
भीमा पाटस कारखान्यावर पोलिसांनी अडवल्यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. कारखाना ही खासगी मालमत्ता नाही, ही सरकारी मालमत्ता आहे. तुम्ही एका खासदाराला अशाप्रकारे अडवू शकत नाही. कारखान्यात जाण्यासाठी मला एनओसीची गरज नाही. याला झुंडशाही म्हणातात, याला गुंडशाही म्हणतात, मी खासदार २० वर्षापासून खासदार आहे. मी राज्यसभेचा खासदार आहे, मला संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभांनी निवडून दिलं, अशा शब्दांत संजय राऊतांनी पोलिसांना सुनावलं. तसेच कारखान्यावर जाण्यापासून अडवणूक करणाऱ्या पोलिसांवर केंद्रात हक्कभंगाची तक्रार करणार, असंही राऊत यावेळी म्हणाले. यानंतर पोलिसांनी संजय राऊतांसह काही सदस्यांना कारखाना परिसरात प्रवेश दिला.