भाजपाचे आमदार राहुल कुल यांना केंद्रस्थानी ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत. आजच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असा आरोप केला. या प्रकरणी आपण देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच काय तर या घोटाळ्याचे दोन हजार पानांचे पुरावे आपण फडणवीस यांना देणार आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अग्नीपरीक्षा ठरणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. आपण जाणून घेऊ की अचानक चर्चेत आलेले हे राहुल कुल आहेत तरी कोण?
जेजुरीच्या व्हिडिओमुळे राहुल कुल चर्चेत
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राहुल कुल हे नाव खूप चर्चेत आलं होतं. सप्टेंबर महिन्यात जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला गेलेल्या राहुल कुल यांनी आपली पत्नी कांचन कुलला उचलून घेतलं आणि जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या होत्या. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. राहुल कुल हे पुण्यातल्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. याआधी ते राष्ट्रीय समाज पक्षात होते. २०१९ मध्ये राहुल कुल यांनी भाजपात प्रवेश केला. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल याही प्रभावी नेत्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल या भाजपाच्या तिकिटावर बारामतीतून उभ्या होत्या. त्यांनी सुप्रिया सुळेंना तगडी टक्कर दिली. सुप्रिया सुळेंना ६ लाख ८६ हजार ७१४ मतं मिळाली होती तर कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मतं मिळाली होती.
राहुल कुल यांच्या घरातला राजकीय वारसा
आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे १९९० मध्ये अपक्ष आमदार झाले. त्यानंतर शरद पवार आणि कुल कुटुंबाची जवळीक वाढली होती. १९९९ मध्ये सुभाष कुल यांना शरद पवारांमुळे आमदारकी मिळाली. सुभाष कुल यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली. २००९ मध्ये राहुल कुल यांनाही पक्षाने संधी दिली होती. निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा आरोप करत राहुल कुल यांनी रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती आमदारकी खेचून आणली. त्या निवडणुकीपासून शरद पवार आणि राहुल कुल यांच्यातून विस्तवही जात नाही. २०१९ मध्ये कुल यांनी रासपची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.
संजय राऊत राहुल कुल यांच्याविरोधात आक्रमक का?
संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्याविरोधातच हे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, यामागे एक मोठं कारण पुढे आलं आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली. राऊत यांना ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’ या वक्तव्यावरून लेखी खुलासा मागण्यात आला आहे. त्यामुळेच आता त्यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
संजय राऊत यांच्या आरोपांवर काय म्हणाले राहुल कुल?
संजय राऊतांनी नैराश्येतून हे आरोप केले आहेत. त्यांना वस्तुस्थितीची माहिती नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोप केले. मी २० ते २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. हा कारखाना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहे. राऊत राऊतांनी केलेले आरोप हे पूर्णत: राजकीय असून राजकारणात अशा प्रकारे आरोप होणं स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया राहुल कुल यांनी दिली. पुढे बोलताना, हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी असल्यानेच राऊतांनी हे आरोप केले का? असं विचारलं असता, मी २० ते २२ वर्षांपासून या कारखान्याशी संबंधित आहे, त्यामुळे हे आरोप नेमके आताच का झाले, हे समजून घेणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.