वाई परिसरातून गेल्या दोन दिवसांत तब्बल पाचशे कबुतरांची चोरी झाली आहे. याबाबत पोलीसात तक्रार दाखल झालेली नसली तरीही कबुतर शौकिनांचे मात्र यामुळे किमान पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.    येथील सिध्दनाथवाडी, सानगिरवाडी, रविवारपेठ, सनगरआळी, गंगापुरी, फुलेनगर भागात अनेक कबुतर शौकीन राहतात. या साऱ्यांचा कबुतरे पाळण्याचा व्यवसाय आहे. हे पक्षी हाताळण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. या लोकांकडे कबुतरांच्या ढाबळी तयार केलेल्या असतात. यामध्ये किमान शे- दोनशे कबुतरे पाळली जातात. दररोज सकाळी या व्यावसायिकांकडून ही कबुतरे आकाशात सोडली जातात. नंतर त्यांच्या विशिष्ट हातवारे, आवाजावरून ते त्यांना परतही बोलावतात. पण गेल्या दोन दिवसांत त्यांनी सोडलेलीसारी कबुतरे नाहीशी झालेली आहेत. यामागे चोरांची एखादी संघटित टोळी कार्यरत असल्याचा या व्यावसायिकांना संशय आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रकारातून या भागात तब्बल पाचशे कबुतरे नाहीशी झाले आहेत.