ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ जानेवारीपासून पर्यटकांसाठी नवीन नियम
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नियोजित वेळेपेक्षा पर्यटक १५ ते २० मिनिट उशिरा पोहचले तर आता ५०० रूपये दंड भरावा लागणार आहे. बहुसंख्य पर्यटक दीड ते दोन तास उशिरा येत असल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने हा नवा नियम केला आहे. १ जानेवारी पासून तो लागूही करण्यात आला आहे.
ताडोबात मोहुर्ली, झरी, पांगडी, कोलारा, खुटवंडा व नवेगांव अशा एकूण सहा ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत. हिवाळय़ात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये सकाळी साडे सहा वाजता प्रवेश दिला जातो तर दुपारी दोन वाजता सफारीला सुरूवात होते. त्यामुळे पर्यटकांना या सहाही प्रवेशद्वारांवर सकाळच्या सत्रात सफारीसाठी पावणेसात पर्यंत पोहचणे अनिवार्य आहे. एखादा पर्यटक उशिरा पोहचला तर त्याला ५०० रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात सुद्धा हा नियम अशाच पद्धतीने लागू राहणार आहे. यासंदर्भात ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रवीण यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अनेक पर्यटक दुपारी दोन वाजताची सफारी असेल तर चार वाजता येतात आणि मग प्रवेशद्वारावर वन कर्मचाऱ्याला लवकर सोडण्यासाठी आग्रह करतात. या पर्यटकांना वेळेचे महत्व कळावे आणि वेळेचे बंधन पर्यटकांनी पाळावे यासाठी हा ५०० रूपये दंडाचा नवा नियम तयार करण्यात आला आहे. हा नियम लागू केला असला तरी अजून एकाही पर्यटकाकडून दंड आकारण्यात आलेला नाही असेही ते म्हणाले.
लवकरच बोटिंग सुरू
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इरई धरणात बोटिंग सुरू करण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता तात्काळ बोटिंग सुरू केले जाईल, अशी माहितीही प्रवीण यांनी दिली.