लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कारखान्यातील एचएएल कामगारांच्या सहकारी पतसंस्थेत २००१ ते २०१२ या कालावधीत झालेल्या ५५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर फेरलेखापरीक्षणाने पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
२००१-१२ या कालावधीत संचालक व पदाधिकाऱ्यांनी सहकार कायदा, सोसायटीचे उपविधी, सहकाराची मार्गदर्शक तत्त्वे व मूल्यांची पायमल्ली करून मनमानी कारभार केल्याने पतसंस्थेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. विशेष लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या फेरलेखापरीक्षणातही पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सोसायटी नवनिर्माण कृती समितीच्या वतीने प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिली आहे. पतसंस्थेच्या आर्थिक नुकसानीबाबत सचिवासह दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायदा कलम ८८ नुसार चौकशी सुरू आहे.
सहकार खात्याची परवानगी न घेता पतसंस्थेच्या कार्यकक्षेबाहेर असणाऱ्या विषयात मोघम ठराव करून अवैधरीत्या गुंतवणूक केलेल्या २६ कोटीपैकी १७ कोटी रुपये व त्यावरील व्याज परत मिळालेले नाही. या प्रकरणात संचालकांनी आपला फायदा साधल्याचे फेरलेखापरीक्षणात म्हटले आहे. फेरलेखापरीक्षणात मांडण्यात आलेल्या इतर मुद्दय़ांमध्ये एक कोटी १८ लाख रुपये बेकायदा सानुग्रह वाटप, हिशेबात घोळ करून खोटा नफा दाखविल्याने भांडवलाचे ११ कोटी ५६ लाख ८० हजार ७५२ रुपयांचे नुकसान, बेकायदा १४ कोटी २१ लाख १० हजार ५८८ रुपयांच्या भाग-भांडवलाची रक्कम परत, दलालीच्या लोभाने तीन कोटी १२ लाख चार हजार ९३७ रुपये बेकायदा मुदत ठेवीत गुंतविणे, कायदा कलम ६६ चे उल्लंघन, संगनमताने पतसंस्थेच्या सभासदांची आर्थिक फसवणूक केली म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सचिवासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल, यांचाही उल्लेख आहे.
११ वर्षांत संचालक मंडळाने जवळजवळ ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे सभासदांना कर्ज मिळणे बंद झाले असून, सहकार खात्याने तत्परतेने पतसंस्थेच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सोसायटी नवनिर्माण कृती समितीने केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा