धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल, अशा एक ना दोन तब्बल ५५ संचिका तुळजाभवानी मंदिरातून गायब झाल्या आहेत. मंदिरातील घोटाळे दडपून टाकण्यासाठीच या संचिका गायब केल्या असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या संचिका गायब असल्याचा तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्यानंतरही संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष आहे काय? असा सवाल पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी उपस्थित केला आहे.

आस्थापना विभागातील पदभार २०२१ ते २०२२ या कालावधीत दोनवेळा हस्तांतरीत करण्यात आला. नागेश यशवंत शितोळे यांनी जयसिंग जीवन पाटील यांच्याकडे संपूर्ण पदभार दिला आणि जयसिंग पाटील यांनी विश्वास कदम यांच्याकडे १ जानेवारी २०२२ रोजी हा पदभार हस्तांतरीत केला. शितोळे यांच्याकडून पदभार घेत असताना चार्जपट्टीमध्ये असलेल्या ५५ संचिका कदम यांना पदभार हस्तांतरीत करीत असताना गायब झाल्या असल्याचे उघडकीस आले आहे. जयसिंग पाटील यांच्या ताब्यातूनच या संचिका गहाळ झाल्या असल्याचा स्पष्ट तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला दोन वर्षांपूर्वीच सादर करण्यात आला आहे. मात्र तेव्हापासून आजवर या गायब असलेल्या संचिकांचा तपास घेण्याची तसदी मंदिर प्रशासन अथवा जिल्हाधिकार्‍यांनीही घेतलेली नाही. गायब असलेल्या ५५ संचिकांमध्ये अनेक महत्वाचे दस्तऐवज असल्याचेही समोर आले आहे. तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिने आणि दुर्मिळ पुरातन नाणी चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या दिलीप नाईकवाडी यांची संचिका देखील गायब आहे. त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिरातील गैरकारभाराच्या चौकशीसंबंधी असलेल्या संचिकांनाही पाय फुटले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासणीबद्दलची संचिका देखील तुळजाभवानी मंदिरातून गायब झाली आहे. पदोन्नती, लेखाधिकारी प्रतिनियुक्ती पदभार, स्थायी संचिका, नवरात्र महोत्सव यात्रा व्यवस्थेबाबत, दानपेटी मोजणी अधिकारी संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेबाबतची कागदपत्रे सध्या मंदिरातून गहाळ झाली आहेत.

हेही वाचा – “राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…”

नागेश शितोळे यांनी पाटील यांच्याकडे पदभार हस्तांतरीत करीत असताना बारा अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे गोपनीय अहवालही जयसिंग पाटील यांच्या ताब्यात दिले होते. जयसिंग पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील पदभार विश्वास कदम यांच्याकडे सुपूर्द करीत असताना गोपनीय अहवाल हस्तांतरीत केले नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. यात राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, मार्तंड दिक्षीत, सिद्धेश्वर इंतुले, विश्वास कदम, विश्वास सातपुते, महेंद्र अदमाने, रामचंद्र यमगर आणि बिभीषण साळुंके यांच्या गोपनीय अहवालाचा समावेश आहे.

पदभार हस्तांतरण प्रक्रियेत संचिका अभिलेख कक्षामध्ये जमा असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात संचिका अभिलेख नोंदवहीत नोंदविण्यात आलेल्या नाहीत. यात मंदिर आणि परिसरात सुरू असलेल्या अनेक महत्वाच्या विकासकामांच्या संचिकांचा देखील समावेश आहे. वित्तीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले. मात्र त्या संचिकांना देखील मंदिरातून पाय फुटले आहेत. आस्थापना विभाग, स्वच्छता विभाग, मेडिकल रजा, चालू अर्ज, सुरक्षा विभाग, विविध खाजगी ठेकेदारांच्या ई-निविदा असलेल्या संचिका असा भलामोठा दस्तऐवज दोन वर्षांपासून गायब असताना जिल्हाधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – “भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…

अन्यथा मंदिरासमोर धरणे आंदोलन

मंदिरातील अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले. चोर आणि चोर्‍या उघडकीस आणल्या. आता हे सगळे प्रकार दाबून टाकण्यासाठीच संचिका गहाळ करण्यात आल्या आहेत. घोटाळेबाज अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळे सुरू असल्याचा दाट संशय आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनीही याकडे दुर्लक्ष का केले, हे समजून येत नाही. या संचिकांचा तत्काळ पत्ता लावून दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई न केल्यास तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोरच धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिला आहे.