Guillain-Barré Syndrome in Pune : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत एकूण ५९ लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. यापैकी १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांनी जीबीएसची प्रकरणी पुणे महापालिकेकडे (पीएमसी) अहवाल दिला.
त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अधिकाऱ्यांना बाधित व्यक्तींचा सखोल वैद्यकीय इतिहास घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जीबीएस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे, जो शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला करणारे अँटीबॉडीज तयार करतो. “हे एकतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा इन्फ्लूएंझा सारख्या आजाराचा परिणाम आहे. परंतु या आजाराला घाबरण्याची गरज नाही”, असं डॉ पुलकुंडवार म्हणाले. लोकांना पिण्यासाठी पाणी उकळण्याचे, शिळे किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५९ रुग्णांपैकी ३३ रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील, ११ महापालिका हद्दीतील आणि १२ पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत. तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
कोणत्या वयोगटाला सर्वाधिक धोका?
बाधितांमध्ये अकरा मुले ०-९ वयोगटातील आहेत आणि १२ १०-१९ वयोगटातील आहेत. सात रुग्ण २०-२९ वयोगटातील आहेत तर प्रत्येकी आठ रुग्ण ३०-३९ आणि ४०-४९ वयोगटातील आहेत. पाच रुग्ण ५०-५९ वयोगटातील, सात रुग्ण ६०-६९ वयोगटातील आणि एक व्यक्ती ७०-८० वयोगटातील आहे. आतापर्यंत एकूण बाधितांमध्ये ३८ पुरुष आणि २१ महिला रुग्ण आहेत. त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काळजी करण्याचे कारण नाही
संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ अमित द्रविड यांनी लोकांना घाबरू नये असे आवाहन केले. कारण कॅम्पिलोबॅक्टर संसर्ग असलेल्या प्रत्येक एक हजार लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होतो.
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे सहसा अचानक दिसू लागतात. ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवड्यात वेगाने वाढू लागतात. सामान्य लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे आदी लक्षणांचा समावेश होतो. मुंग्या येणे अनेकदा पायांमध्ये सुरू होते आणि हात व चेहऱ्यापर्यंत पसरू शकते. लोकांना चालण्यातही त्रास होतो; ज्यामुळे हालचाल करण्यात अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे न्यूरोपॅथिक वेदनादेखील होतात. या वेदना पाठ आणि हातपायांमध्ये दिसतात. स्वायत्त बिघडलेले कार्य जसे की, अनियमित हृदय गती, रक्तदाबातील चढ-उतार आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात. सर्वांत गंभीर प्रकरणांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे संपूर्ण पक्षाघात होऊ शकतो, ज्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन आवश्यक असते.
गुइलेन बॅरे सिंड्रोम कशामुळे होतो?
या आजाराची लागण होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाल्ल्याने किंवा हाताळल्याने) या विषाणूचे संक्रमण. तसेच एपस्टाईन-बॅर व्हायरस, सायटोमेगॅलॉव्हायरस किंवा झिका व्हायरससारखे संक्रमण झाल्यासही याची लागण होते. या संक्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होते, जी नसांना लक्ष्य करते. काही प्रसंगी, इन्फ्लूएन्झा किंवा टिटॅनससारख्या काही लसी गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरू शकतात. परंतु, लसीकरणाच्या फायद्यांच्या तुलनेत याचा धोका अत्यंत कमी आहे.