अहिल्यानगरः जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांमुळे यंदा ५९ गावे टँकरमुक्त झाली आहेत तर मार्च अखेरीपर्यंत आणखी २१ गावे टँकर मुक्त करण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न आहेत. या ८० गावांना आता नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा होऊ लागला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांनी ही माहिती दिली. जिल्हयात गेल्या वर्षी एकूण ३४३ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषदअंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनेच्या आराखड्यात १०८ गावे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कार्यक्रमाच्या आराखड्यातील २३५ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु होता.
जिल्हा परिषदेकडील १०८ गावांपैकी जलजीवन मिशन कार्यक्रमामुळे सध्या ५९ गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. मार्च अखेरपर्यंत आणखी २१ गावे टँकरमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी एकूण १०८ पैकी ८० गावे टँकरमुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे.केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमात जिल्हा परिषदमार्फत नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत असल्याने सततच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणा-या गावांना शुध्द पाणी पुरवठा उपलब्ध झाला आहे. दरवर्षी साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी सुरु होते.
तथापि यावर्षी ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पाठपुरावा करुन, जिल्ह्यातील कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणा-या ५९ गावांच्या योजनेच्या कामातील काही उपांगाची कामे अद्याप प्रलंबीत असली तरी, योजनेतून पाणीपुरवठा सुरु केल्याने टँकरची मागणी आणि टँकरमागे फिरण्याची टंचाईग्रस्तांची वणवण थांबली आहे. सतत टँकरग्रस्त असणा-या या गावांना यावर्षी टँकर लागणार नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचे हे यश मानले जाते. परिणामी शासनाचा टँकरवर होणा-या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. यामध्ये अकोले १, कर्जत २५, जामखेड १२, नगर २, नेवासा १, पाथर्डी ५, पारनेर ७, श्रीगोंदा १, संगमनेर ४, कोपरगाव १ या गावांचा समावेश आहे.
शाश्वत स्त्रोत बळकटीकरणासाठी आराखडा तयार
पाणीपुरवठा याजनेच्या शाश्वततेसाठी स्त्रोतांचे बळकटीकरण करणे अत्यंत महत्वाचे असल्याने, ८३० गावातील १६७२ (अस्तित्वातील स्त्रोत व जलजीवन मिशन योजनेचे स्त्रोत) स्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी १५ हजार ३४८ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पुर्नभरण चर, सिमेंट बंधारे, कोअर गॅबीयन बंधारे, पाझर तलाव व साठवण तलाव दूरुस्ती, पाऊसपाणी संकलन, मेटॅलीक टँक, अपारंपारीक उपाययोजना, विहिर खोलीकरण व आडवी कुपनलिका आदी उपाययोजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.-आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद म.