माजी आमदार शंभूराज देसाई व पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यातील शाब्दिक वाद आता राजकीय वळणाकडे असल्याच्या चर्चेला शंभूराज यांनी फोडणी दिली. आपल्यावरील तक्रार हे पाटणकरांचे षडयंत्र असल्याचा आरोप शंभूराज यांनी केला आहे. तर, तहसीलदार सबनीस यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना, चुकीचे वागल्यानंतर तक्रार दाखल होणारच, यात व्यक्तिगत कोणाच्याही हेव्यादाव्याचा संबंधच येत नसल्याचे सांगितले.
ढेबेवाडी येथील शासकीय धान्य गोदामाच्या भिंतीच्या बांधकामाबाबत माजी आमदार शंभूराज देसाई व तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यात काल मोबाईलवरून चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. यानंतर शंभूराज देसाई व समर्थकांकडून तहसील कार्यालय परिसरात येत शासकीय कामात अडथळा आणत धमकी देणे व दमदाटी करणे असे प्रकार घडल्याच्या तहसीलदारांच्या तक्रारीवर आज शंभूराज देसाई व संबंधित ५ कार्यकर्ते स्वत:हून पाटण पोलिसात दाखल झाले.  त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायलायीन कोठडी मिळाली. यावर जामीन अर्ज दाखल झाला असता सहाही जणांचा जामीन मंजूर करण्यात आला.  दरम्यान, शंभूराज यांनी ‘लोकसत्ता’कडे आपली बाजू मांडली. ते म्हणाले, की तहसीलदार माझ्याशी फोनवरून एकदा नव्हे तर, दोनदा उर्मट बोलले. यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलो असता, त्यांनी चूक मान्य करून माफी मागितली. मात्र, दरम्यान आमदारपुत्रांचे शिष्टमंडळ संबंधितांना भेटले. आणि आमची काहीही चूक नसताना, धमकी, दम दिला. असे आमच्यावर खोटेनाटे कुभांड रचून पोलिसात तक्रार देण्यात आल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. विनाकारण गुन्ह्यात अडकवण्यासाठीच आमदार विक्रमसिंह पाटणकरांनी रचलेले हे षडयंत्र असून, तहसीलदारांच्या माफीनाम्यानंतर पाटणकरांनी जाणीवपूर्वक राजकीय वळण दिले आहे. विक्रमसिंह पाटणकर व त्यांचे पुत्र सत्यजित यांच्याकडून सत्तेचा व अधिकाराचा गैरवापर होत असल्याची टीका देसाई यांनी केली.

Story img Loader