कोयना धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस कायम असून, गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात बक्कळ अशा ६ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरही पावसाची रिपरिप कायम आहे. पावसाने सरासरीचा टप्पा गाठला असून, पाणीटंचाईचे अरिष्ट टळल्याचे चित्र आहे. गेल्या सलग २१ दिवसांतील दमदार पावसाने कोयना शिवसागरात सुमारे ५५ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान मिळाले आहे. तर, बहुतांश जलसिंचन प्रकल्प क्षमतेने भरले असून, उर्वरित प्रकल्प शिगोशिग भरण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान, कोयना नदीवरील पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पुलासह कमी उंचीचे सर्वच पूल पाण्याखालीच असून, कराडनजीकच्या खोडशी वळण बंधा-यावरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. कृष्णा, कोयना नद्या दुथडी वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील लहान, मोठय़ा प्रकल्पांचा पाणीसाठा सुमारे ८३ टक्के झाला आहे. सध्या -कोयना शिवसागरात सुमारे ६९ टीएमसी म्हणजेच ६५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. धरणात प्रतिसेकंद ५५ हजार क्युसेक पाण्याची सातत्याने आवक होत आहे. दरम्यान, वारणा, राधानगरी व तारळीसह काही प्रकल्पांतून पाणी सोडणे कायम आहे. गेल्या ३६ तासांत कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात २६६ एकूण ३,०३९, महाबळेश्वर विभागात ४०८ एकूण २,८६० तर नवजा विभागात ३११ एकूण सर्वाधिक ३,५९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस ३,१६५.६६ मि.मी. आहे.
कोयनेत ६ टीएमीसीची वाढ; बहुतांश प्रकल्प भरले
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस कायम असून, गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात बक्कळ अशा ६ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरही पावसाची रिपरिप कायम आहे.
First published on: 01-08-2014 at 04:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 tmc increase in koyna