सातारा लोकसभा मतदारसंघातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. शेवटच्या टप्प्यापर्यंत अंदाजे ५५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कडाक्याचा उन असतानाही यंदाच्या निवडणुकीत कमालीचा उत्साह दिसून आला. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामास्वामी यांनी गेले दोन महिने मतदार जनजागृती अभियान राबवत ८० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, असे उद्दिष्ट ठेवले होते. यात इलेक्ट्रॉनिक मिडियालासुद्धा मिडिया पार्टर्नर म्हणून सहभागी केले होते. गेल्या निवडणुकीत मतदान ५२ टक्क्यांपर्यंत झाले होते. ते किमान २० टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदानात त्या प्रमाणात वाढ झालेली दिसली नाही. तरी ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. सकाळच्या टप्प्यात मतदानाला वेगाने प्रारंभ झाला. सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत जवळपास २२ ते २५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हाच्या तडाख्याने मतदानाचा वेग मंदावला. त्यानंतर ४ ते ६  या वेळेत पुन्हा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास प्रारंभ केला. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले, आम आदमीचे राजेंद्र चोरगे, तसेच जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांनी सकाळी ७.३० च्या दरम्यान मतदानाचा हक्क बाजावला. खा. भोसले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले याही होत्या. यानंतर सर्वच उमेदवार विधानसभा मतदार संघांच्या पाहणीसाठी रवाना झाले. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पाटण कॉलनीत दुपारी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणात होती. तर सायंकाळी कामगार वर्गाची उपस्थिती जाणवण्याइतपत होती. मतदारांना कोणतेही आमिष दाखवू नये यासाठी निवडणूक निर्वाचन आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदार केंद्राभोवती असणारी उपाहारगृहे, रसवंतीगृहे दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. मतदारांना त्यांच्या स्लीप देण्याचे कामही शासकीय कर्मचा-यांनी विहित वेळेत पूर्ण केल्याने शहरात मतदार यादीत नाव नाही अशा किरकोळ तक्रारी झाल्या.
सातारा शहरात गोडोली, कोडोली या भागातील काही मतदान केंद्रांवर तर शहरातील बोगदा परिसरात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. तर गोडोलीतीलच शाहूनगर परिसरात ४५ टक्क्यांपर्यंत मतदानाची नोंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाली.  सातारा लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीसाठी सुमारे ९४ हजार मतदार नव्याने सामील झाले. ही तरुणाई प्रथमच मतदान करत असल्यामुळे त्यांच्यात मोठय़ा प्रमाणात उत्साह होता. ६ विधानसभा मतदारसंघातून झालेल्या मतदानाची यंत्रे कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात सील करण्यात येणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक निर्वाचन आयोगाचे मुख्य निरीक्षक बंस आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामास्वामी यांनी पाहणी केली. पहाटेपर्यंत सर्व ठिकाणाहून मतदान यंत्रे पोहचतील, असे डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.
साता-यात निर्भयपणे मतदान- उदयनराजे
माझ्याबाबतीत मी धाकधपटशाहीने वागतो, असा आरोप केला जातो. मात्र साता-यात अशी कोणतीही तक्रार झालेली नाही. आज साता-यात सर्वजण निर्भयपणे मतदान करत आहेत. लोकशाहीवर आमचा विश्वास आहे आणि लोकशाही मार्गाने तसेच शांततेत ही निवडणूक झाल्याने हे सिद्ध झाले आहे.
मतदारांवर विश्वास- जाधव
कोणत्याही राजकीय पक्षाच्या पािठब्याशिवाय कोणतीही जाहीर सभा न घेता कमीत कमी खर्चात होत असलेली ही निवडणूक आहे. माझा मतदारांवर विश्वास आहे. ते मला खासदार नक्कीच करतील.
 

Story img Loader