सोलापूर : परदेशात भरपूर पगाराच्या नोक-या मिळवून आमीष दाखवून एका टोळीने बेरोजगार तरूणांना आर्थिक गंडा घालण्याचा चालविलेला उद्योग उजेडात आला आहे. यात ६० तरूणांची फसवणूक झाली असून आर्थिक फसवणुकीची रक्कम ३६ लाख एवढी आहे. यासंदर्भात सिराज अ. रशीद नदाफ (वय ४०, रा. विद्यानगरजवळ, उत्तर सदर बझार, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सय्यद मसूद ऊर्फ असद गझनफरअली खतीब व त्याचा भाऊ सय्यद गझनफरअली खतीब (रा. कोंडानगर, सोलापूर), सय्यद नावेदहुसेन (रा. माहीम दर्ग्याजवळ, मुंबई) आणि रईस इलाहीबक्ष दलाल (रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> सिद्धनाथ मंदिरात चांदीच्या मूर्तींची चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक
१ जानेवारी २०२२ ते २१ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. सय्यद मसूद ऊर्फ असद गझनफरअली खतीब व त्याच्या साथीदारांनी सोलापुरात अशोक चौकात डायनॕमिक कन्सल्टंन्सी आॕफ मॕन पाॕवर सर्व्हिसेस या नावाचे कार्यालय थाटले होते. या कार्यालयामार्फत परदेशात भरपूर पगाराच्या नोक-यांची संधी मिळवून देण्याचे आमीष दाखवून बेरोजगार तरूणांना भुरळ पाडण्यात आली. या कार्यालयात फिर्यादी सिराज नदाफ यास कन्सल्टंट म्हणून नोकरीवर ठेवण्यात आले होते. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषापोटी बेरोजगार तरूणांना माहिती पत्रके वाटण्यात आली. माहिती पत्रकावर संपर्कासाठी फिर्यादी सिराज नदाफ यांचे नाव आणि संपर्क क्रमांक छापण्यात आले होते. बेरोजगार तरूणांनी परदेशातील नोकरीच्या आशेपोटी डायनॕमिक कन्सल्टंन्सी कंपनीशी संपर्क साधला. या तरूणांकडून व्हिसा, नोकरीची नेमणूक पत्रे आणि ठरल्याप्रमाणे परदेशात पाठविण्यासाठी संबंधित तरूणांकडून पैसे उकळण्यात आले. एकूण ६० तरूणांनी मिळून ३६ लाखांची रक्कम भरली. परंतु नंतर हा फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. घेतलेली रक्कम परत मागितली असता पीडित तरूणांना शिवीगाळ करून धमकावत हाकलून लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd