विश्वास पवार

नाताळच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकाच्या गर्दीने महाबळेश्वरच्या गर्दीने यावेळी उच्चांक मोडले आहेत. सलग सुट्टीच्या काळातील तीन दिवसांत महाबळेश्वरला साठ हजार पर्यटकांनी भेट दिली. २४ ते २७ डिसेंबर या काळात दहा हजार छोटी-मोठी वाहने पाचगणी महाबळेश्वर या परिसरात गिरीस्थानावर आली.

मोठय़ा संख्येने पर्यटक आल्याने वाहतूक कोंडीही झाली. महाबळेश्वर -पाचगणी दरम्यान सात ते आठ किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रतापगड ते महाबळेश्वर रस्त्यावरही कोंडी होती. त्यामुळे याबाबत दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.

पर्यटकांच्या गर्दीने वाहतूककोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने नियोजन केल्यानंतरही अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणीची वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली. पुणे-मुंबईकडून आलेल्या पर्यटकांमुळे वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाट, पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यात सात ते आठ किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने नियंत्रण करताना तारांबळ उडत होती. प्रशासनाने नेटके नियोजन करूनही वाहतूक यंत्रणा कोलमडून गेली होती. सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व वाईच्या उपाधीक्षक डॉ. शीतल जानवे यांनी अतिरिक्त बंदोबस्त तनात करूनही नियोजनच कोलमडलेच.

बेशिस्त वाहनचालक

जागा मिळेल तिथे, झाडा झुडपांत पर्यटकांनी वाहने उभी केली. पोलीस प्रशासनाकडून महाबळेश्वर शहर व पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर नियोजन करताना गोंधळ झाला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी रात्री नऊपर्यंत ठिकठिकाणी पर्यटक व स्थानिक नागरिकांना वाहतुकीच्या रांगेत राहावे लागले.  वाहतूक संथ गतीने सुरू होती.अनेकांना मोटारीत तासन्तास बसावे लागले.

वाहनतळ गरजेचा

महाबळेश्वर पाचगणी येथील वाहतूककोंडी व येणाऱ्या वाहनांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी वाई शहरात अथवा वाईच्या पश्चिम भागात धोम व बलकवडी धरणाच्या परिसरात मोठा वाहन तळ उभारून पर्यटकांना महाबळेश्वर पाचगणी येथे जाता येईल अशी व्यवस्था उभारणे गरजेचे झाले आहे. लोक एकाच वेळी बाहेर पडल्याने पुणे-बेंगलोर महामार्गावरही वाहतुकीचा ताण आला खेड शिवापुर ,आनेवाडी, तासवडे टोल नाक्यावर मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

लोणावळ्यात एक लाख पर्यटक

लोणावळा:  नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार व रविवारी लोणावळ्यात एक लाख पर्यटक आले होते. लोणावळा व खंडाळा परिसरातील विविध स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. हजारो वाहने येथे आल्याने तीन दिवस वाहतूककोंडी झाली होती. करोनाकाळात येथील पर्यटन ठप्प होते. मात्र आता काही प्रमाणात पर्यटन सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. कार्ला व भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटकांची प्रामुख्याने गर्दी होती.

महाबळेश्वरच्या वाढत्या वाहतुकीचा गर्दीत येऊन अंदाज घेतला. कोठे वाहतूककोंडी होते त्या ठिकाणांची पाहणी केली. पर्यटकांशी संवाद साधला. वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पर्यटकांना महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद घेता यावा, पर्यटकांना वाहतूककोंडी मध्ये अडकून पडावे लागू नये याची दक्षता घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

– शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री