महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६०४ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. या जिल्ह्यातील सात गावांची विशेष पुरस्कारासाठी निवडही झाली आहे. जिल्ह्यातील तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या गावांची संख्या लक्षात घेतल्यास अद्याप जवळपास निम्मे म्हणजे ६८६ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  तंटामुक्त गाव मोहिमेचे २०१२-१३ हे सहावे वर्ष. मागील पाच वर्षांतील अहमदनगर जिल्ह्याच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास सुमारे ५० टक्के गावे तंटामुक्त झाल्याचे लक्षात येते. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, म्हणजे २००७-०८ मध्ये या जिल्ह्यातील ३२ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली, तर एका गावाची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यानंतर २००८-०९ मध्ये अहमदनगरची कामगिरी खाली घसरली. तेव्हा केवळ २६ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली, तर दोन गावांनी विशेष पुरस्कार मिळविला. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षांत म्हणजे २००९-१० मध्ये नगरमधील ३९ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली.
त्या वेळी एकाही गावास शांतता पुरस्कार मिळाला नाही. २०१०-११ हे चौथे वर्ष अहमदनगरच्या कामगिरीचा आलेख उंचावणारे ठरले.
या एकाच वर्षांत जिल्ह्यातील ३३६ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली, तर विशेष पुरस्कार मिळविणाऱ्या गावांची संख्या होती, चार. २०११-१२ या पाचव्या वर्षांत या जिल्ह्यातील १७१ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली, परंतु विशेष पुरस्कारासाठी एकाही गावाची निवड झाली नाही. या जिल्ह्यातील सहभागी होणाऱ्या १२९० पैकी पाच वर्षांत ६०४ गावे तंटामुक्त झाल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून दिसून येते. यावरून अद्याप ६८६ म्हणजे निम्मी गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader