वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारी वाढत असल्याने राज्यात लवकरच ६१ हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी सांगितले.
सह्य़ाद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत शुभारंभासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘राज्यात ६१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला शासनाने नेमलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची मान्यता मिळाली आहे. लवकरच तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर पोलीस भरतीला प्रारंभ होईल. राज्यात सध्या ६१ हजारांहून अधिक पोलिसांची गरज आहे.’
सातारा जिल्ह्य़ातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात पाटील म्हणाले, की लोकसंख्या वाढल्याने गुन्हेगारी वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्य़ात पोलीस ठाणी वाढवण्याची गरज असून, आणखी चार पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन व नंतर दोन यानुसार त्याला मंजुरी मिळेल. मात्र, ठाणी वाढली की मनुष्यबळ नेमणे, त्यांना प्रशिक्षण देणे या बाबींना विलंब लागेल. काही पोलीस ठाण्यात अकार्यक्षम कर्मचारी असून, बदलीच्या कायद्यामुळे त्यांना बदलणेही अवघड होत आहे.
नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिवाळीची शुभेच्छापत्र इंग्रजीत पाठविल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केल्यासंदर्भात विचारले असता, त्यासाठी राजीनामा मागण्याची आवश्यकता नसून, पुढच्या वेळी मंत्री सामंत मराठीतून शुभेच्छापत्रे पाठवतील असा निर्वाळा त्यांनी दिला.
साखर कारखानदारांनी एकत्रित निर्णय घ्यावा
शेतकरी संघटनेचे आंदोलन होण्यापूर्वीच साखर कारखानदारांनी एकत्र बसून ऊसदर निश्चित करावा. जनतेला वेठीस धरून कोणी आंदोलन करणे उपयोगाचे नाही. वाहनांची नासधूस करणे, महामार्ग रोखणे असे प्रकार योग्य नाहीत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास आमचा र्निबध नाही अशी भूमिका मांडताना, मात्र, या वर्षी आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेऊन पोलीसबळ वाढवले जाईल असा इशारा राज्याचे आर. आर. पाटील यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 61 thousand police recruitment campaign begins this year r r patil
Show comments