वाघ, बिबटे व अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चार वर्षांत ६२ लोकांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक ३१ मृत्यू वाघाच्या, १८ मृत्यू बिबटय़ा व ७ मृत्यू रानडुकराच्या हल्ल्यात झाले आहेत. दरम्यान, या वन्यजीव-मानव संघर्षांत दोन वाघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धुमाकूळ घालणाऱ्या २६ वाघ व बिबटय़ांना जेरबंद करून २४ निसर्गमुक्त करून दोन मध्यप्रदेशातील भोपाळ येथील राष्ट्रीय उद्यानात पाठविले आहेत.
तब्बल ४८ टक्के वनक्षेत्र असलेल्या या जिल्ह्य़ात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, ब्रम्हपुरी व मध्यचांदा वन विभाग, तसेच वनविकास महामंडळाचे जंगल आहे. यात सुमारे १६० ते १७० वाघ, त्यांची पिल्ले, बिबटे व अन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. यातील सर्वाधिक वाघ ताडोबा प्रकल्पाच्या बफर व कोर क्षेत्रात आहे. मात्र, वाघांना आता हे जंगल कमी पडायला लागले आहे. त्याचा परिणाम वाघ जंगलाबाहेर पडून माणसांवर हल्ला करीत आहेत. यातूनच या जिल्ह्य़ात वन्यप्राणी-मानव असा संघर्ष उभा राहिलेला आहे. या संघर्षांत २०१० ते २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत ६२ लोक मृत्यूमुखी पडले. २०१० मध्ये वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात १३, २०११ मध्ये ११, २०१२ मध्ये १, २०१३ मध्ये ११ व २०१४ मध्ये आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच रानडुकराच्या हल्ल्यात ७, अस्वल २, गवा १ व अज्ञात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
यातही सर्वाधिक २३ लोकांचे मृत्यू हे ब्रम्हपुरी वन विभागात, त्या पाठोपाठ चंद्रपूर वन विभागात १५, मध्य चांदा वन विभागात ५, वनविकास महामंडळाच्या जंगलात १३, ताडोबाचे बफर क्षेत्रात ३ व कोर क्षेत्रात २ लोकांचा मृत्यू झाला आहे. वन्यजीव-मानव संघर्ष तीव्र होत असल्याचे बघून चार वर्षांत २६ वाघ व बिबटय़ांना जेरबंद करण्यात आले. यातील बहुतांश वाघ व बिबटय़ांना वनखात्याने मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावले आहे. यातील २४ बिबट मायक्रोचिप व कॉलर लावून जंगलमुक्त करण्यात आले, तर उर्वरीत दोन बिबटे मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले. वन्यजीव-मानव संघर्ष अधिक तीव्र झाल्यानंतर वनखात्याने आतापर्यंत दोन वाघाला गोळ्या घातल्या. यातील एक वाघ ३० नोव्हेंबर २००७ मध्ये ब्रम्हपुरी वन विभागातील नवरगाव वनपरिक्षेत्रात, तर दुसरा वाघ १९ ऑगस्टला पोंभूर्णाजवळील डोंगरहळदी येथे ए.के.४७ या बंदुकीने गोळ्या घालून ठार करण्यात आले. या जिल्ह्य़ात वन्यजीव व मानव संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आता वन विभागाने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचा नवीन आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरभक्षकाच्या चौकशीसाठी एनटीसीएचे पथक येणार
पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथे १९ ऑगस्टला वाघाला नरभक्षकी ठरवून त्याची हत्या केली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार स्थानिक वन्यजीवप्रेमींनी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेश गोपाल, केंद्रीय मंत्री व वन्यजीव अभ्यासक मेनका गांधी, राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे केली आहे. या तक्रारींची दखल घेऊन एनटीसीएची एक चमू वाघाच्या हत्येची चौकशी करण्यासाठी येणार आहे. पुढच्या आठवडय़ातच हे पथक येथे येणार असून या परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षांचीही माहिती जाणून घेणार आहे.