सांगली जिल्ह्यात शोध अभियानात ६२ कुष्ठरोग बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी २८ रुग्ण असंसर्गित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक असल्याने निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान दि. ३१ जानेवारी ते दि. १४ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील १०० टक्के लोकांची तपासणी करून समाजातील दडून राहिलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अभियानाच्या दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांच्या घरोघरी जाऊन कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज, भेदभाव व कुष्ठरोगाची शास्त्रीय माहिती देऊन त्यांची शारीरिक तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. एस. बी. आलदर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जाधव, बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. छाया पाटील, डॉ. विनायक पाटील, अशोक लवटे, महानगरपालिकेचे डॉ. विजय ऐनापुरे आदी उपस्थित होते.
यापूर्वी कुष्ठरोग शोध अभियान दि. २३ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानात ६२ कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले होते. यापैकी २८ रुग्ण हे असंसर्गित व ३४ रुग्ण हे संसर्गित कुष्ठरुग्ण प्रकारात मोडत होते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.