डोंबिवलीतील ६५ बेकायदा ‘रेरा’ घोटाळ्यातील इमारतींमधील आरोपी मे. गोल्डन डायमेंशन, मे. वास्तु रचना या आस्थपनांमधील (फर्म) वास्तुविशारद, त्यांच्या कार्यालयांची माहिती घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी दोन दिवसापासून डोंबिवलीत विविध भागात तपास करत आहेत. या दोन्ही आस्थापनांची वास्तवदर्शी माहिती मिळत नसल्याने ‘ईडी’चे अधिकारी चक्रावून गेले आहेत. रेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा इमारतींचा ईडीकडून तपास सुरू झाल्याने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे.
हेही वाचा- ठाणे : शिळफाटा रस्त्यालगतची १५० अतिक्रमणे जमीनदोस्त
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींसंबंधीचा अहवाल ईडीला काही दिवसापूर्वी प्राप्त झाला. त्या अनुषंगाने ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीचा तपास ही भूमाफियांना शासनाने दिलेली हूल आहे, असा गैरसमज माफियांनी करून घेतला होता. प्रत्यक्ष तपास सुरू झाल्याने डोंबिवली परिसरात भागात मर्सिडिज, बीएमड्ब्ल्यु मधून फिरणारे माफिया शहरातून गायब झाले आहेत. त्यांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे खात्रीलायक सुत्राने सांगितले.
६५ बेकायदा इमारत प्रकरणात सर्वाधिक बेकायदा बांधकाम आराखडे तयार करणाऱ्या मे. गोल्डन डायमेंशन, मे. वास्तु रचना या वास्तुविशारद आस्थापनांची (फर्म) ईडीने ‘द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट’च्या महाराष्ट्र संस्थेकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती हाती लागण्यापूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस डोंबिवली शहराच्या विविध भागात फिरुन गोल्डन डायमेंशन (ऐश्वर्या किरण, देसलेपाडा, भोपर रोड, नांदिवली पाडा, डोंबिवली पूर्व आणि सुदर्शन व्हिला सोसायटी, केळकर रोड, डोंबिवली पूर्व), वास्तु रचना (पत्ता व नाव नाही) या दोन आस्थपनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना संबंधित पत्त्यावर या संस्थांचे अस्तित्व आढळून आले नाही.
हेही वाचा- ठाणे : वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या भंगार वाहने हटविण्याची कारवाई सुरुच
ईडीला गोपनीय प्राप्त माहितीनुसार जून २०२२ पर्यंत गोल्डन डायमेंशनच्या शीर्षक पत्रावर वास्तुविशारदाचा उल्लेख न करता थेट स्वाक्षरी आणि लहान आकाराचा शिक्का मारला जात होता. सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये रेरा घोटाळाप्रकरणात या आस्थापनेचे नाव पुढे येताच या आस्थापनेचा शिक्का मोठा करुन नावात फेरबदल करुन ते गोल्डन डायमेंशन्स करण्यात आले. वास्तुविशारद म्हणून स्वाक्षरी, शिक्का मारला जात आहे, असे ईडी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. वास्तु रचना आस्थापनेचा पत्ता अधिकाऱ्यांना निश्चित होत नाही. या दोन्ही आस्थापना मागील अनेक वर्षापासून कोण चालवित आहे. त्यांची निश्चित नावे स्पष्ट होत नसल्याने तपास अधिकारी गोंधळून गेले आहेत.
वास्तुविशारदांची नावे निश्चित नाहीत, त्यांच्या कार्यालयांचा ठिकाणा नसताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने या दोन्ही आस्थापनांचे बांधकाम आराखडे कोणत्या निकषावर मंजूर केले. ६५ इमारती प्रकरणी विशेष तपास पथक, ईडीच्या चौकशा सुरू झाल्यावर सुध्दा २० डिसेंबर २०२२ मध्ये गोल्डन डायमेंशन्सने भोपर मधील एका जागेचा आराखडा पालिकेत मंजुरीसाठी कसा काय दाखल केला, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. विविध यंत्रणांना संपर्क करुन ईडी अधिकारी या दोन आस्थापनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या राजुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल
समन्सची तयारी
गोल्डन डायमेंशन्स, वास्तु रचना या दोन आस्थापनांच्या वास्तुविशारदांनी सर्वाधिक बेकायदा बांधकामे डोंबिवलीत केली आहेत. या वास्तुविशारदांना चौकशीचे समन्स बजावण्यासाठी ईडी या आस्थापनांच्या कार्यालयांचा तपास करत आहे. या प्रकरणात पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांशीही अधिकारी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. ६५ बेकायदा इमारतीत सुमारे २०० विकासक, जमीन मालक, वास्तुविशारद, मध्यस्थ अशा एकूण सुमारे २५० जणांची चौकशी होण्याची शक्यता अधिकाऱ्याने वर्तवली. २५० माफियांनी बांधकामांतून उभारलेला पैसा कोठुन आणला आणि कोठे जिरवला याकडे चौकशीचा रोख असणार आहे, असे ईडीच्या एका वरिष्ठाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
“ईडीने आमच्याकडे मागविलेली माहिती ही नवी दिल्लीतील कौन्सिल ऑफ आर्किटेक्टकडील नोंदणीकृत आहे. आमची संस्था व्यावसायिक आहे. मागविलेल्या माहितीमधील दोन्ही फर्म कोणाच्या नावे आहेत हे स्पष्ट होत नाही. नावे असती तर तो आधार घेऊन आम्ही ती माहिती काढून ईडीला दिली असती. तरीही, दिल्लीतील माहितीसाठी ईडी अधिकाऱ्यांना संपर्कासाठी आम्ही सर्वोतपरी साहाय्य करणार आहोत. याप्रकरणात जे सहकार्य तपासासाठी लागेल त्यासाठी त्यांना मदत करू, अस आश्वासन द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष संदीप बावडेकर यांनी दिले.
ईडी अधिकाऱ्यांकडून डोंबिवलीतील रेरा इमारत घोटाळ्यातील सहभागींच्या तपासाला सुरुवात झाली आहे. ईडी कडून लवकरच आपणास दुसऱ्या जबाबासाठी पाचारण करण्यात येणार आहे. त्यावेळी पालिका अधिकारी, पोलीस, मध्यस्थ यांची माहिती आपण देणार आहोत, अशी माहिती वास्तुविशारद संदीप पाटील यांनी दिली