आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त आशा अग्रवाल यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्हय़ातून अवघे ६६ कोटी रुपये इतका कमी आयकर मिळतो. ही अर्थमंत्री तसेच चंद्रपूरकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब नाही. आम्हाला अर्थमंत्र्यांच्या जिल्हय़ातून आयकराच्या अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे. तेव्हा यावर्षी सर्वानी आयकर उत्पन्नाचे रिटर्न भरावे, असे निर्देश आयकर नागपूर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त आशा अग्रवाल यांनी दिले.

आयकर विभाग चंद्रपूरच्या वतीने येथील एनडी हॉटेलमध्ये समाजातील विविध घटकांशी संवाद व चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयकर विभाग, नागपूरच्या प्रधान मुख्य आयुक्त आशा अग्रवाल, के.डी. शुल्का, चंद्रपूरचे आयुक्त अशोककुमार कोली उपस्थित होते. यावेळी श्रीमती अग्रवाल यांनी चेंबर ऑफ कॉमर्स, एमआयडीसी असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, आयकर सल्लागार असोसिएशन, वकील, पत्रकार तथा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करीत आयकर उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना, यावर्षी आयकर उत्पन्न फाईल करणाऱ्यांची संख्या लाखाने वाढल्याची माहिती दिली. ही वस्तुस्थिती असली तरी चंद्रपूर जिल्हय़ातून आयकर विभागाला म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याची खंत अग्रवाल यांनी यावेळी बोलून दाखवली. गेल्यावर्षी केवळ ४४ कोटीचे उत्पन्न झाले. यावर्षी ६६ कोटीच्या उत्पन्नाचे लक्ष्य आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हय़ातून इतक्या कमी प्रमाणात आयकर उत्पन्न होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब नाही. तेव्हा उत्पन्न वाढवण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.  यावर्षी चंद्रपूर जिल्हय़ाला २७ हजार आयकरदात्यांनी रिटर्न फाईल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातील २३ हजार पूर्ण झाले असून लक्ष्य गाठण्यासाठी आणखी चार हजार लोकांनी रिटर्न फाईल करण्याची गरज आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वानी १०० रिटर्न भरण्याचे लक्ष्य ठेवून २७ हजारांचा आकडा गाठावा, असेही त्या म्हणाल्या. बहुसंख्य लोक आयकर सल्लागार व वकिलांचे शुल्क अधिक असल्यामुळे आयकर रिटर्न भरत नाहीत. तेव्हा आयकर सल्लागारांनी किमान एक वर्षे शुल्क माफ करावे, असेही आवाहन त्यांनी केले. आयकर भरणे हे आयकर अधिकाऱ्यांसोबतच प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. मात्र, बहुसंख्य लोक आयकर भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हय़ात दहा लाखाच्यावर बँक खात्यात पैसे जमा करणारे व्यक्ती आहेत. तेव्हा आयकर विभागासोबतच सर्वानी या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना आयकर भरण्यास सक्तीचे करावे, असेही त्या म्हणाल्या.

अन्यथा कारवाईला सामोरे जा

आयकर सल्लागार म्हणून अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस करीत असलेल्या नागपुरातील दोन जणांचे परवाने रद्द केल्याची माहिती आशा अग्रवाल यांनी दिली. केवळ इतकेच नाही तर २० मालमत्तांचे लिलाव केल्याचेही सांगितले. कायद्याने व नियमाने काम कराल तर ठीक अन्यथा आम्ही कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.