सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात गेल्या दोन वर्षांपासून पाणीसाठय़ाची अवस्था बिकट असताना सुदैवाने यंदा पावसाळय़ात धरणाच्या लाभक्षेत्रात तसेच पुणे जिल्हय़ात झालेल्या पावसामुळे या धरणातील पाणीसाठय़ात केवळ १० दिवसांत साडेसात टीएमसीने वाढ झाल्याचे दिसून येते. १० दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा वजा ५० टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. धरणाच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्हय़ाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक मानली जात होती. सलग दोन वर्षे दुष्काळाचे संकट झेलणाऱ्या सोलापूरकरांना केवळ पावसावर विसंबून राहावे लागत असताना सुदैवाने उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाला प्रारंभ झाला. तसेच पुणे जिल्हय़ातही भीमा नदीच्या क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने त्याचा फायदा उजनी धरणाला होत आहे.
गेल्या दोन वर्षांत दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातील पाणी वितरणाचे योग्य नियोजन न झाल्याने सुमारे २२ टीएमसी पाणी गायब झाले होते. त्याचा हिशोब लागत नव्हता. यासंदर्भात मागणी करूनदेखील उच्चस्तरीय चौकशी झाली नाही. या पाश्र्वभूमीवर १० दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाण्याचा साठा नीचांकी म्हणजे वजा ५० टक्के इतका खालावला होता. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात वाढत चालला आहे. १० दिवसांत साडेसात टीएमसी पाणी वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठा वजा ५० टक्क्यांवरून वजा ३४ टक्क्यांपर्यंत वर आला आहे. ही बाब दुष्काळी सोलापूर जिल्हय़ासाठी आश्वासक मानली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत उजनी धरणात पाण्याची पातळी ४८७.९८२ मीटर असून एकूण पाणीसाठा १२७९.७३ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा वजा ५२३.०८ दलघमी इतका म्हणजे वजा ३४.४८ टक्के इतका असल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाणीसाठय़ाची वाढ होत असल्याचे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी सांगितले.
उजनी धरणात दहा दिवसांत साडेसात टीएमसी पाणीसाठा
सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात गेल्या दोन वर्षांपासून पाणीसाठय़ाची अवस्था बिकट असताना झालेल्या पावसामुळे या धरणातील पाणीसाठय़ात केवळ १० दिवसांत साडेसात टीएमसीने वाढ झाल्याचे दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 5 tmc water level in ujani dam in 10 days