गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व छत्तीसगड दलमचे ३ उपकमांडर व ४ सदस्यांसह ३० लाखांचे बक्षीस असलेल्या ७ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळ हादरली आहे.
राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे या जिल्ह्य़ातील बरेच नक्षलवादी शरण येत आहेत. कंपनी क्रमांक ४ चा उपकमांडर जानू उर्फ गोमा गोंगलू गोटा (३२,रा.बुर्गी), शिरपूर चिन्नूर दलम आंध्रप्रदेशचा उपकमांडर राजेश उर्फ कोटेश्वरराव बोरीया कनिती (२७, रा.ऐट्रालपल्ली, जि. खम्मम), सीएनएम दलम उपकमांडर निर्मला उर्फ सरिता दसरू नरोटे (३०,रा.कटेझरी), कुत्तूल दलम छत्तीसगडचा सदस्य श्यामराव उर्फ टांगरू मिसा उसेंडी (४५,रा.रेखनार), डिव्हिजनल स्टॉफ टिमचा सदस्य रतन मुंशी कोवासे (२२,रा.गट्टा), खोरार दलम सदस्य सुशीला उर्फ सुखमती राजू मडावी (३३,रा.नरकानार, कांकेर, छत्तीसगड) आणि कंपनी क्र. ४ सदस्य रम्मी उर्फ महानंदा मानू पोटावी (२१,रा.रेगडीगुट्टा), असे ७ जहाल नक्षलवादी आज शरण आले. त्यामुळे नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. जानू उर्फ सोमा गोंगलू गोटा हा २००६ मध्ये सुरजागड दलमचा सदस्य होता. त्यानंतर २००९ मध्ये कंपनी ४ मध्ये पदोन्नती होऊन तो उपकमांडर म्हणून कार्यरत होता. गेंदा, कोटमी, तोडगटा, चेडवाही, ईरपगुट्टा, चंद्राखंडी, तोंदेल चकमकीत सहभागी होता. उपकमांडर राजेश उर्फ कोटेश्वरराव बोरीया कनिती हा २०१० ला सगरी दलममध्ये भरती होऊन २०११ पर्यंत सदस्य होता. २०११ ला आदिलाबाद दलममध्ये बदली होऊन २०१५ पर्यंत सदस्य होता. चिन्नूर दलममध्ये बदली होऊन उपकमांडर होता. लंकाचेन, चिन्नावट्रा, कुरंगड, खुर्सागुडम या चकमकीत सहभागी होता. निर्मला उर्फ सरिता दसरू नरोटे ही २००२ मध्ये टिपागड दलम सदस्य म्हणून भरती झाली. छत्तीसगडमधील नारायणपूर दलममध्ये बदली, २००४ पासून सीएनएममध्ये पदोन्नती होऊन उपकमांडर होती. मुलचेरा, रामनटोला, जप्पी, तुतेकन्हार चकमकीत सहभाग, श्यामराव उर्फ टांगरू मिसा उसेंडी हा २००१ पासून कसनसूर दलममध्ये सक्रीय, तर २००३ पासून कुत्तूल दलममध्ये बदली होऊन सदस्य होता. जप्पी, कोटमी, कसूरवाही, रेकानार चकमकीत सहभाग होता. रतन मुंशी कोवासे २००९ मध्ये गट्टा दलममध्ये भरती होऊन २०१० पासून डिव्हिजनल स्टॉफ टिमचा सदस्य होता. नेलगुंडा, कोडसेपल्ली चकमकीत सहभाग होता. सुशीला उर्फ सुखमती राजू मडावी ही २०१० पर्यंत मिलिशिया दलममध्ये सक्रीय होती. २०१२ पासून खोरार दलमची सदस्य होती. गोडलवाही, काकडवेली, मरकेगाव, डोकेनटोला, राजेश कुमारी हत्या, चिचोडा माजी सरपंच अपहरण, चिमरीकल चकमकीत सहभाग होता. रम्मी उर्फ महानंद मानू पोटावी २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सक्रीय व बंदूर, मुंगनेर, हत्तीगोटा, पदाबोरीय चकमकीत सहभागी होता. वरिष्ठ नक्षल्यांचे आत्मसमर्पण व पुर्नवसन झाल्याने इतरही नक्षल सदस्य आत्मसमर्पणाचा मार्ग धरत असल्याचे या सात जणांच्या आत्मसमर्पणातून दिसून येते.
गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आत्मसमर्पण योजना अतिशय प्रभावीपणे राबवित असून नक्षल चळवळीला उतरती कळा लागली आहे. विशेष म्हणजे, कोटमी पोलिस मदत केंद्र हे नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे केंद्र ठरले असून तब्बल १५ नक्षलवाद्यांनी येथे आत्मसमर्पण केले आहे.

Story img Loader