अलिबाग : महाड औद्योगिक वसाहतीतील ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ कंपनीत शुक्रवारी सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. त्यात सात कामगार जखमी झाले असून, ११ जण बेपत्ता आहेत. कंपनीच्या पावडर प्लान्टमध्ये सकाळी ११ च्या सुमारास पहिला स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचे लोळ उठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा गाडय़ांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. वायुगळती, रसायनमिश्रित द्रव्यांच्या लहान-मोठय़ा स्फोटांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
हेही वाचा >>> ‘त्या’ स्फोटातील गंभीर जखमी तरूणाचाही मृत्यू; पती-पत्नीच्या मृत्यूमुळे दुर्घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले
दुर्घटनेवेळी कंपनीत ५७ कामगार होते. स्फोटाच्या आवाजाने त्यातील काही जण बाहेर पडले. मात्र, कंपनीच्या आतील भागात काम करणारे कामगार अडकून पडले. शर्थीचे प्रयत्न करून बचावपथकांनी सात जणांना बाहेर काढले. त्यांना महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ११ कामगार बेपत्ता असून, ते आतमध्येच अडकल्याची भीती आहे. साडेपाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात बचाव पथकांना यश आले. जवळपास १५ छोटो-मोठे स्फोट झाले असून, बचावकार्य सुरू आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ जण बेपत्ता असल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी बसेसची तोडफोड, घरे अन् शासकीय कार्यालयांची जाळपोळ; सदावर्तेंची उच्च न्यायालयात धाव, याचिकेत काय?
आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. महाड ‘एमआयडीसी’तील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. ५ ऑक्टोबरला ‘एमआयडीसी’तील प्रसोल केमिकल्स कंपनीत विषारी वायुगळतीने एका कामगाराला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले होते. या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बेपत्ता कामगारांची नावे
शेषराव भुसारे, अक्षय सुतार, सोमिनाथ वायदंडे, विशाल कोळी, आदित्य मोरे, अस्लम शेख, सतीश साळुंखे, बिकास महंतू, जीवन कुमार चौबे, अभिमन्यू दुराव, संजय पवार
‘एनडीआरएफ’च्या पथकाला पाचारण
बचावकार्यासाठी नागोठणे आरपीसीएल कंपनीच्या रसायन तज्ज्ञांच्या पथकाला बोलावण्यात आले. मात्र, कंपनीत जिथे पहिला स्फोटात झाला तिथे मोठय़ा प्रमाणात ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याशिवाय आत जाणे बचाव पथकांना शक्य झाले नाही. त्यामुळे बेपत्ता ११ कामगारांच्या शोधासाठी ‘एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले.