शनिवार मराठवाडय़ासाठी घातवार ठरला! औरंगाबाद व बीड जिल्ह्य़ांत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. वऱ्हाडाचा टेम्पो उलटून घडलेल्या अपघातात १५जण जखमी झाले. लातूर जिल्ह्य़ातील नळगाव येथील एस. टी. बसमधील स्फोटात २० प्रवासी जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री-राजूर रस्त्यावर रांजणगाव फाटय़ावर भरधाव टेम्पोची दोन दुचाकींना धडक बसून एकमेकांच्या मावसबहिणी असलेल्या दोन महिला व त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. सकाळी साडेसातच्या दरम्यान हा अपघात घडला. टेम्पोचालक अपघातानंतर पळून गेला. या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात तुळसाबाई भीमराव गायकवाड (वय ५०), हृषीधर भीमराव गायकवाड (वय २०, दोघेही वाघोळा, तालुका फुलंब्री), तसेच संतू भाऊडू शिंदे (वय २०, पोफळा, तालुका फुलंब्री) हे तिघे जागीच ठार झाले. तर संतूची आई सुमित्राबाई भाऊडू शिंदे (वय ५०) यांचा उपचारार्थ घाटीत हलविले असताना मृत्यू झाला.
बीड जिल्ह्य़ात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर १५जण जखमी झाले. नातेवाइकाच्या अंत्यविधीस निघालेल्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. सोनाजी रामनारायण शेलार (वय ५०) व बलभीम श्यामराव शेलार (वय ५५, निरगुडी) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे निरगुडी येथे सोनाजी शेलार यांच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून निघाले होते. पिठ्ठीच्या पुलाजवळ कंटनेरने दुचाकीला धडक दिली. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेला टेम्पो पाली गावाजवळ उलटून १५जण जखमी झाले. हे सर्व जण गेवराई तालुक्यातील उंबरवाडी येथे चंद्रकांत मुळे यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थित राहण्यासाठी चालले होते.
जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. बाशी रस्त्यावर घडलेल्या तिसऱ्या घटनेत मालमोटारीची धडक बसून सर्जेराव श्यामराव दुनघव हा पादचारी जागीच ठार झाला.
विविध अपघातांत सात ठार, वऱ्हाडाचा टेम्पो उलटून १५ जखमी
शनिवार मराठवाडय़ासाठी घातवार ठरला! औरंगाबाद व बीड जिल्ह्य़ांत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. वऱ्हाडाचा टेम्पो उलटून घडलेल्या अपघातात १५जण जखमी झाले. लातूर जिल्ह्य़ातील नळगाव येथील एस. टी. बसमधील स्फोटात २० प्रवासी जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
First published on: 12-05-2013 at 02:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 killed and 15 injured in 7 different accident in marathwada