सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम न फोडता त्यातून सात लाखांची रक्कम मंगळवारी रात्री पळविणाऱ्या पाच आरोपींना अवघ्या चार तासांत मुद्देमालासह पकडण्यात आले. लुटीच्या वेळी एटीएम मशीनमधून छेडछाडीचा संदेश थेट बँकेच्या व्यवस्थापकांना गेला. त्यांनी लगेच चेन्नईच्या नियंत्रण केंद्रात लुटीची माहिती कळविली. त्यानंतर हिंगोली पोलिसांनी वेगाने हालचाली करून पाचही आरोपींचा शोध घेत लुटली गेलेली रक्कमही ताब्यात घेतली. एटीएममधून ५०० रुपयांच्या १ हजार ४०० नोटा अशी सात लाखांची रक्कम भामटय़ांनी पळविली होती. न्यायालयासमोर उभे केले असता पाचही आरोपींना १५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
शहराच्या शास्त्रीनगर भागात सेंट्रल बँकेचे एटीएम केंद्र आहे. येथील शिवाजी राजू वाघमारे हा एटीएम चालक म्हणून कामावर होता. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एटीएम परिसरात कोणी नसताना काही जणांनी एटीएमचा दरवाजा उघडून गोपनीय कोड क्रमांकाच्या आधारे मशीन उघडली व त्यातील सात लाख रुपये पळवले. या लुटीच्या वेळी मशीनला झालेल्या छेडछाडीचा संदेश (एसएमएस) थेट बँकेच्या व्यवस्थापकांना गेला. व्यवस्थापकाने हा संदेश मिळताच तातडीने चेन्नईच्या एटीएम आयएसएसएसडीबी सिक्युरिटी प्रा. लि. यांना माहिती कळविली.
कंपनीने तात्काळ हालचाली करीत नांदेड येथील कर्मचारी बालाजी सुभाष वाघमारे यास घटनास्थळी पाठवले. बँकेत पोहोचल्यावर वाघमारे याने एटीएमची तपासणी केली. या वेळी गोपनीय कोड वापरून मशीन उघडल्याचे आणि सात लाख रुपये रक्कम लुटली गेल्याचे त्याच्या लक्षात आले. वाघमारे याने शहर पोलिसात माहिती दिली. पोलीस अधीक्षक एन. अंबिका, उपअधीक्षक सुनील लांजेवार, शहर ठाण्याचे निरीक्षक सतीश टाक, विवेक सोनवणे या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजेवार यांच्या पथकाने एटीएमचा येथील चालक शिवाजी वाघमारे यास ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानेच आरोपींना कोडबाबत माहिती दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी नंतर सचिन ज्ञानदेव मुसळे याला ताब्यात घेतले. या दोघांकडून इतर तिघांची नावे मिळाली. पोलीस पथकाने त्यांनाही ताब्यात घेतले. अवघ्या चार तासांत एटीएममधून पळविली गेलेली सात लाखांची रक्कम पाच आरोपींसह पोलिसांनी ताब्यात घेतली.
बालाजी सुभाष वाघमारे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शिवाजी राजू वाघमारे, सचिन ज्ञानदेव मुसळे, गणेश तातेराव घुगे, संजय विठ्ठल गडदे, विष्णू शिवाजी बांगर यांना गुन्हा नोंदवून अटक केली.
‘बंद’ सीसीटीव्हीवर आच्छादन!
विशेष म्हणजे चोरटय़ांनी एटीएमला असलेल्या सीसीटीव्हीवर पोस्टर लावले होते, मात्र वरच्या बाजूने असलेला सीसीटीव्ही गेल्या सहा महिन्यांपासून बंदच असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांच्या गावीही नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा