करमाळा-नगर रस्त्यावर जातेगावाजवळ बोलेरो जीप व मालमोटारची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात मोटारीतील सातजणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृत औरंगाबाद जिल्हय़ातील वैजापूर भागातील असून ते सर्वजण अक्कलकोट, गाणगापूर व पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले असताना वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घालून हिरावून घेतले.
या अपघातातील मृतांची नावे अशी-वसंतराव विश्वनाथ मापारी (वय ५६), अरुण श्यामराव नाईकवाडी (वय ४५), बाबासाहेब सखाहरि भगत (वय ३५), दुर्गादास काशिनाथ शिंदे (वय ५५), प्रकाश कापसे (वय ४०), ज्ञानेश्वर गंगाराम इंगळे (वय ५०) व मोटारचालक गणेश कारभारी जेऊरकर (वय ३०, सर्व रा. पाटील गल्ली, वैजापूर). या अपघातात सुनील मगनराम गायकवाड (वय ४२) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर करमाळय़ातील डॉ. सारंगकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता, की सातजणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेहांची अवस्था छिन्नविच्छिन्न झाली होती. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता.
यातील सर्व मृत व जखमी वारकरी सांप्रदायातील असून दरमहा पाचशे रुपये गोळा करून जमा झालेल्या पैशातून पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. परंतु नेहमीप्रमाणे हे सर्वजण देवदर्शनासाठी निघाले असता वाटेत त्यांना मृत्यूने गाठले. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास हे सर्वजण बोलेरो जीपमधून (एमएच २० पीएच ५७६९) नगर-करमाळामार्गे पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. सकाळी नऊच्या सुमारास त्यांची गाडी करमाळय़ाच्या अलीकडे दहा किलोमीटर अंतरावरील जातेगावजवळ आली असता समोरून येणाऱ्या मालमोटारीची (पीएन ५२ ए ८८९४) या गाडीला जोरदार धडक बसली. अपघातानंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला रस्ताचौपदरीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ात कोसळली. अपघातात मोटारीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. तर त्यातील मृतांची अवस्था ओळख पटण्यापलीकडे झाली होती.
या अपघातातील मृत वसंतराव मापारी हे वैजापूर नगरपरिषदेत भांडारपाल तर नाईकवाडी हे लघुपाटबंधारे विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. कापसे हे विद्युत महावितरण कंपनीत सेवेत होते. जखमी सुनील गायकवाड हे वैजापूरचे माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख आहेत. या अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे हे त्या ठिकाणी धावून आले. स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तर करमाळा शिवसेनेचे सुधाकर लावंड, प्रवीण कटारिया, संजय शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी मदतकार्य केले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी हे करमाळय़ात तातडीने दाखल झाले. पोलिसांनी मालमोटारचालक विवेक आर. राजवेल (रा. तामिळनाडू) यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(संग्रहित छायाचित्र)
करमाळय़ाजवळ मोटार-ट्रकच्या अपघातात सात भाविक जागीच ठार
करमाळा-नगर रस्त्यावर जातेगावाजवळ बोलेरो जीप व मालमोटारची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात मोटारीतील सातजणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
First published on: 04-04-2013 at 07:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 pious killed on the spot near karmala in motor truck accident