पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी तसेच सोलापूर शहरासह अन्य छोटय़ा-मोठय़ा गावांना पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत तसेच धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाच सुमारे सात टीएमसी पाणी सोडण्यास गुरुवारी प्रारंभ झाला. त्यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्हय़ातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
उजनीच्या पाणीप्रश्नावर जनभावना दिवसेंदिवस नाजूक होत असताना अखेर त्याची दखल शासनाला घेणे भाग पडले. गुरुवारी उजनी धरणातून भीमा नदीत पाच टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. याशिवाय धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातूनही सुमारे दोन टीएमसीपर्यंत पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या प्रश्नावर बारामतीकरांकडून सोलापूरवर अन्याय होत असल्याची जनभावना वाढीस लागली असून, नेमक्या याच मुद्यावर सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी मुंबईत तब्बल १२१ दिवस आंदोलन केले होते. परंतु त्या आंदोलनाची दखल न घेता उलट त्याची हेटाळणी केली गेली. तर याच पाणीप्रश्नावर मुंबईत उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला तरी प्रत्यक्षात सोलापूरकरांना पुण्यातून अपेक्षित पाणी मिळू शकले नाही. या पाश्र्वभूमीवर प्रभाकर देशमुख यांनी आता बारामतीत जाऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला तर दुसरीकडे शेकापचे माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. पाण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे तब्बल ३५ निवेदने प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनीही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यामुळे अखेर या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नरमाईची भूमिका घेणे भाग पडले.
या प्रश्नावर मुंबईत अजित पवार यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या वेळी सर्वानी केलेल्या मागणीचा विचार करून अखेर उपमुख्यमंत्र्यांनी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदा विभागाला दिला.
दरम्यान, उजनी धरणात सध्या वजा १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या महिनाभरात या धरणात वजा ५० टक्के पाणीसाठा होता. त्यात ३० टक्के पाणीसाठय़ाची वाढ झाली आहे. तथापि, या धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडावे व नीरा देवघर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सोडले
पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी तसेच सोलापूर शहरासह अन्य छोटय़ा-मोठय़ा गावांना पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत तसेच धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाच सुमारे सात टीएमसी पाणी सोडण्यास गुरुवारी प्रारंभ झाला.
First published on: 12-07-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 tmc water released from ujani dam for pandharpur ashadhi wari