स्त्रीभ्रूण हत्याप्रकरण घडलेल्या म्हैसाळमधील मंडळाचा निर्णय
स्त्रीभ्रूण हत्याप्रकरण घडलेल्या म्हैसाळच्या सीमेवर असलेल्या बेडगेच्या गणराज मंडळाने यंदापासून गणेशोत्सवाच्या कालावधीत जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावे सात हजारांची ठेव ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गणराज सुकन्या समृद्धी योजना या नावाने गावात जन्मास येणाऱ्या कन्येला या योजनेचा लाभ देण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे.
स्त्रीभ्रूण हत्येमुळे म्हैसाळची राज्यभर कुप्रसिद्धी झाली. मात्र समाजात असलेली मानसिकता कमी करण्याचे शासकीय प्रयत्न तोकडे ठरत असल्याचे वास्तव आजही कायम आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्याची कल्पना मंडळाचे संस्थापक सुनील सूर्यवंशी यांनी मांडली. याला अध्यक्ष मल्हारी खरात यांच्यासह उपाध्यक्ष भाऊसो सोलनकर, कार्याध्यक्ष सुनील खरात आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा निर्णय या वर्षांपासूनच अमलात आणण्याचा निर्णय घेतला.
मंडळाच्या वतीने आज गणेशोत्सवास प्रारंभ करण्यात आला असून गणेशविसर्जन आठव्या दिवशी करण्यात येते. या कालावधीत गावातील कुटुंबात मुलीचा जन्म झाला, तर तिच्या नावाने सात हजार रुपये ठेव म्हणून ठेवण्यात येतील. या ठेवीची रक्कम मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी अथवा विवाहासाठी पालकांना वापरता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गणराज कन्या समृद्धी योजना असे या योजनेचे नामकरणही करण्यात आले आहे.
यासाठी गावातील रुग्णालयांनाही मंडळाने कळविले असून मुलगी जन्माला आली, तर मंडळाला कळविण्यास सांगितले आहे. तसेच या कालावधीत मिरजेच्या अथवा अन्य ठिकाणी गावातील एखाद्या महिलेने मुलीला जन्म दिला, तर तिलाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी गावात जाहिरातीद्वारे या योजनेची प्रसिद्धीही करण्यात आली आहे.