सावंतवाडी नगर परिषदेचा सन २०१६-१७ चा १३ कोटी ३१ लाख ९५ हजार ४६५ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी सादर केला. हा एकूण ७४ कोटी १३ लाख ५१ हजार ३६२ रुपयांचा आहे. शहरवासीयांवर कोणत्याही करांचा बोजा नसणारा अर्थसंकल्प असून घनकचऱ्यापासून कोळसा आणि प्लास्टिक कचऱ्यापासून क्रुड ऑईल बनविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी बोलताना सांगितले. बबन साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.सावंतवाडी नगर परिषदेचा १३ कोटी ३१ लाख ९७ हजार ४६५ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्पर मंजूर करण्यात आला. महसुली जमा ११ कोटी ९१ लाख ९१ हजार ४०० रुपये, भांडवली जमा ४८ कोटी ९८ लाख ६२ हजार ५०० रुपये मिळून एकूण जमा ७४ कोटी १३ लाख ५१ हजार ३६२ रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पात महसुली खर्च ११ कोटी ९८ लाख ४० हजार ४७० रुपये तर भांडवली ५५ कोटी ५४ लाख रुपये मिळून एकूण खर्चाचा ६७ कोटी ४३ लाख ४०० रुपये अर्थसंकल्प आहे.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य जनतेवर कराचा कोणताही बोजादेखील लादण्यात आलेला नाही. घरपट्टी, पाणीपट्टीचे दर पूर्वीप्रमाणेच असून त्यात वाढ करण्यात आली नाही असे नगराध्यक्ष बबन साळगांवकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सांगितले.

घन कचऱ्यापासून कोळसा बनविणे, प्लास्टिक कचऱ्यापासून क्रुड ऑईल बनविण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले असून, अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली आहे. जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण सेंटर व ग्रंथालय उभारण्यास प्राधान्य देण्यात आले आहे असे नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले.

श्रमसाफल्य योजनेमधून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरांची निर्मिती करण्याच्या कामास प्राधान्य, अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करून ऊर्जेवरील खर्च कमी करण्याबाबत विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. शहर व परिसरात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला अकादमीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत असे नगराध्यक्ष साळगांवकर म्हणाले.

आरक्षित जमीन, भूसंपादनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मागासवर्गीयांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. अंध, अपंग आणि अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. कचरा विल्हेवाट, निर्मूलनासाठी एक ट्रॅक्टर व एक मॅक्झीमो खरेदीस प्राधान्य  देण्यात येत आहे असे नगराध्यक्ष साळगांवकर म्हणाले. या अर्थसंकल्पाची नगराध्यक्ष साळगांवकर यांनी ठळक वैशिष्टय़े सांगितली. ते म्हणाले, जिल्हा नगरोत्थानमधून भूसंपादनासाठी चार कोटी, रस्ते व इमारतीसाठी दोन कोटी, संत गाडगेबाबा मंडई बांधण्यासाठी विशेष अनुदान पाच कोटी, रस्ते निधीसाठी १ कोटी ३५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी एक कोटी ४१ लाख, स्पर्धा परीक्षा सेंटर व ग्रंथालय नावीन्यपूर्ण योजनेतून ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य नगरोत्थानमधून पाणीपुरवठा नवी लाइन बनविणे व जुनी लाइन बदलणे आणि गळती काढणे, फिल्टरेशन नवीन सॅण्ड मीडिया बसविण्यासाठी २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. वैशिष्टय़पूर्ण निधीतून रस्त्यासाठी दोन कोटीची तरतूद, जिल्हा पर्यटन निधीतून एक कोटीची तरतूद, घन कचऱ्यापासून कोळसा बनविणे आणि प्लास्टिक निर्मुलनातून क्रुड ऑईल प्रकल्प राबविण्यासाठी १४व्या आयोगातून ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात दलित वस्ती सुधार योजनेतून ४० लाख अनुदान, स्थानिक विकास निधीतून रस्ते विकासासाठी १० लाख अनुदान, प्रधानमंत्री आवास योजनेतून जमीन असेल अशा गरीबांना शंभर घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान म्हणजेच प्रत्येक घराला अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अपारंपरिक ऊर्जा योजनेसाठी ४० लाख तरतूद केली आहे.

श्रमसाफल्य योजनेतून चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासासाठी १० लाखाची तरतूद, रमाई घरकुल योजनेतून सात लाख ५० हजार रुपयांची, मागासवर्गीय कल्याण समितीमधून ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिला सबलीकरणासाठी आठ लाख, अंध, अपंगासाठी पाच लाख, अल्पसंख्याकांसाठी १० लाख, नवीन स्ट्रीटलाईटसाठी पोल उभारणे पाच लाख, पुस्तके खरेदीसाठी दोन लाख, वृक्ष खरेदीसाठी दोन लाख ५० हजार तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनवृद्धीसाठी प्राधान्य देताना सायनेजीस बसविणे, शहराच्या हद्दीलगत ५०० मीटर वरील घरांना पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, शहर स्वच्छतेसाठी दंडात्मक कारवाई करून पाच लाखांचे उद्दिष्ट तर क्रीडा संकल्पासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे साळगांवकर म्हणाले.

नगरोत्थानमधून तीन कोटी मंजूर असून ८७ लाख प्राप्त झाले आहेत. वैशिष्टय़पूर्ण योजनेतून दोन कोटी, गार्डन उभारणीसाठी १४ लाख ५७ हजार, विद्युत पोल बदलणे सहा लाख प्राप्त झाले आहेत असे सांगण्यात आले. या अर्थसंकल्पाचे नगरसेवक राजू बेग, आनारोजीन लोबो, गोविंद वाडकर, साक्षी कुडतरकर, सुभाष पणदूरकर यांनी स्वागत केले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही बबन साळगांवकर यांनी दिली.