केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात राज्यातील किमान ७५ उमेदवार आहेत. हा आकडा मोठा दिसत असला, तरी गेल्या वर्षीच्या सुमारे शंभर यशस्वी उमेदवारांच्या तुलनेत राज्याचा टक्का घसरल्याचे प्राथमिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले आहे. या परीक्षांमधील पुण्याचे स्थान कायम असून, या शहरात अभ्यास करणाऱ्या ४० ते ४५ जणांचा यशस्वी उमेदवारांमध्ये समावेश आहे. मूळचा लातूरचा असलेला कौस्तुभ दिवेगांवकर राज्यात पहिला, तर तिथलीच क्षिप्रा आग्रे राज्यात दुसरी आली आहे. कौस्तुभ याचा देशाच्या गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक आहे.
यूपीएससीचे निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाले. एकूण १०९१ उमेदवार यशस्वी झाले आहेत. मात्र, त्यापैकी ९९८ जणांचीच नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली, उरलेली नावे राखून ठेवण्यात आली आहेत. ९९८ जाहीर नावांपैकी किमान ७५ नावे महाराष्ट्रातील आहेत. पुण्यापाठोपाठ लातूर, नंदूरबार, धुळे, वाडा (ठाणे) अशा लहान शहरांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या यूपीएससी निकालांमध्ये महाराष्ट्रातून शंभरवर उमेदवार यशस्वी झाले होते. या वेळी मात्र हा आकडा खाली आला आहे. या वर्षी मुलाखतींसाठीच राज्यातील उमेदवारांचे प्रमाण कमी होते. त्याचाच फटका राज्याला बसला असल्याचे विविध संस्थाचालकांनी सांगितले. देशातील पहिल्या शंभर यशस्वी उमेदवारांमध्ये ५ मराठी विद्यार्थी, तर पहिल्या उमेदवारांमध्ये १२ जणांचा समावेश आहे. एकूण यशवंतांमध्ये मुलींचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे.

हरिथा कुमार देशात पहिली
सलग तिसऱ्या वर्षी निकालात मुलींची बाजी
सध्या भारतीय महसूल सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या हरिथा कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘आयएएस’सह अन्य अखिल भारतीय सनदी सेवा परीक्षेत देशात सर्वप्रथम आल्या आहेत. या परीक्षेवर सलग तिसऱ्या वर्षी महिलांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. खुला संवर्ग, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती अशा तीनही संवर्गात महिला उमेदवारांनी अग्रस्थान पटकाविले आहे.
हरिथा कुमार या केरळ विद्यापीठाच्या बी.टेक. पदवीधर असून, त्यांनी आपल्या चौथ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. डॉक्टर असलेल्या व्ही. श्रीराम यांनी देशात दुसरा तर बी. एस्सी. असलेल्या स्तुती चरण यांनी देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
प्रस्तावित १०९१ जागांच्या तुलनेत ९९८ उमेदवार सनदी सेवांसाठी निवडले गेले. ४५७ उमेदवार खुल्या संवर्गातून, २९५ उमेदवार अन्य मागास संवर्गातून, १६९ उमेदवार अनुसूचित जातींमधून तर, ७७ उमेदवार अनुसूचित जमातींमधून निवडण्यात आले. यशस्वी उमेदवारांमध्ये ७५३ पुरुष आणि २४५ महिलांचा समावेश आहे.
देशभरातील पहिले २५ विद्यार्थी हे १२ राज्यांमधून निवडले गेले आहेत. या २५ जणांमध्ये शेतकरी, शिक्षक, उद्योजक, शासकीय सेवेतील अधिकारी, डॉक्टर, वकील आणि सनदी सेवेतील अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. देशभरातील पहिल्या २५ जणांपैकी ६ जणांनी हे उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात, ९ जणांनी दुसऱ्या प्रयत्नात, ८ जणांनी तिसऱ्या प्रयत्नात मिळवले आहे. तर प्रत्येकी एक व्यक्ती चौथ्या तसेच सहाव्या प्रयत्नांत उत्तीर्ण झाली आहे.

Story img Loader