केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात राज्यातील किमान ७५ उमेदवार आहेत. हा आकडा मोठा दिसत असला, तरी गेल्या वर्षीच्या सुमारे शंभर यशस्वी उमेदवारांच्या तुलनेत राज्याचा टक्का घसरल्याचे प्राथमिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले आहे. या परीक्षांमधील पुण्याचे स्थान कायम असून, या शहरात अभ्यास करणाऱ्या ४० ते ४५ जणांचा यशस्वी उमेदवारांमध्ये समावेश आहे. मूळचा लातूरचा असलेला कौस्तुभ दिवेगांवकर राज्यात पहिला, तर तिथलीच क्षिप्रा आग्रे राज्यात दुसरी आली आहे. कौस्तुभ याचा देशाच्या गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक आहे.
यूपीएससीचे निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाले. एकूण १०९१ उमेदवार यशस्वी झाले आहेत. मात्र, त्यापैकी ९९८ जणांचीच नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली, उरलेली नावे राखून ठेवण्यात आली आहेत. ९९८ जाहीर नावांपैकी किमान ७५ नावे महाराष्ट्रातील आहेत. पुण्यापाठोपाठ लातूर, नंदूरबार, धुळे, वाडा (ठाणे) अशा लहान शहरांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या यूपीएससी निकालांमध्ये महाराष्ट्रातून शंभरवर उमेदवार यशस्वी झाले होते. या वेळी मात्र हा आकडा खाली आला आहे. या वर्षी मुलाखतींसाठीच राज्यातील उमेदवारांचे प्रमाण कमी होते. त्याचाच फटका राज्याला बसला असल्याचे विविध संस्थाचालकांनी सांगितले. देशातील पहिल्या शंभर यशस्वी उमेदवारांमध्ये ५ मराठी विद्यार्थी, तर पहिल्या उमेदवारांमध्ये १२ जणांचा समावेश आहे. एकूण यशवंतांमध्ये मुलींचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा