विविध धरणातून होत असलेला विसर्ग लक्षात घेउन पूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी तीन वेळा वाढ करून सायंकाळी चार वाजलेपासून  ७५  हजार  क्युसेक करण्यात आला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पश्‍चिम घाटमाथ्यावर जोरदार पाउस पडत असल्याने पूराचा धोका कायम आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रतिष्ठित घराण्यातील मुलींची कोट्यवधींची जमीन हडपली; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

चांदोली, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस कोसळत असला तरी आज सकाळपासून पश्‍चिम भाग वगळता जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे रोजच्या रिपरिप पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, धरणातून विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. कृष्णेची पाणी पातळी अजूनही  मर्यादेत असून स्थिर आहे. चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून आज दुपारी बारा वाजलेपासून १ हजार ५००  क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर दोन दिवसापासून पायथा विद्युतगृहातून  ९११ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढणार असून नदी चार दिवसापासून पात्राबाहेर प्रवाहित आहे. कोकरूड बंधारा गेले आठ दिवसापासून पाण्याखाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावर वाहतूक बंद आहे.

हेही वाचा >>> “…तेव्हा मी अमेरिकेत जाऊन बसणार”, बच्चू कडूंचं मोठं विधान

दरम्यान, पंचगंगा, वारणा नदी पात्रातील पाणी वाढल्याने पूराचा धोका निर्माण झाला आहे. त्यात कृष्णा नदीच्या उपनद्यामधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यने अलमटटी धरणात पाण्याची आवक वाढत आहे. राधानगरी व चांदोली धरणातील विसर्ग विचारात घेउन अलमट्टी धरणातून सकाळी  ३० हजार  क्युसेकचा होणारा विसर्ग दुपारी एक वाजता  ४२ हजार  ६६० तर सायंकाळी चार वाजता  ७५ हजार करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी सकाळी आठवाजेपर्यंत संपलेल्या  २४  तासात जिल्ह्यात सरासरी  १२.३ मिलीमीटर पाउस झाला. सर्वाधिक पाउस शिराळा तालुक्यात २९.३  मिलीमीटर तर सर्वात कमी पाउस पलूस येथे  ७.१ मिलीमीटर नोंदला गेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 thousand cusecs water discharge from almatti dam to prevent flood risk zws
Show comments