जिल्ह्य़ातील नव्यानेच निर्माण झालेल्या गुहागर आणि देवरुख नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये आज सुमारे ७५ टक्के मतदान नोंदवण्यात आले. उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे. गेल्या वर्षांच्या अखेरीस या दोन्ही नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये आज मोठा उत्साह दिसून आला. बहुरंगी लढतींमुळे सर्वच उमेदवारांनी आपापले हुकमी मतदार बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेही मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली.
देवरुख नगर पंचायत निवडणुकीत चार प्रभागांतील १७ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात असून ९ हजार ११५ मतदार आहेत. त्यापैकी ७५ टक्के मतदारांनी आज मतदान केले. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. याचा फायदा युतीला होण्याची चिन्हे आहेत.
पालकमंत्री जाधव यांचा गुहागर विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी येथील नगर पंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्याचबरोबर मध्यंतरी भाजपपासून दुरावलेले पण अलीकडच्या काळात पुन्हा सक्रिय झालेले माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याही राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. येथील चार प्रभागांतील १७ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात असून ७ हजार २७३ मतदार आहेत. येथेही भाजप-सेनेची युती राहिली, तर दोन्ही काँग्रेसनी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत विशेष औत्सुक्य आहे.
आज दिवसभर या दोन नगर पंचायतींच्या निवडणूक मतदानाच्या काळात सर्वत्र मतदारांची चांगली गर्दी दिसून आली. कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेने पार पडले. उद्या दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.