मागील तीन वर्षातील शिल्लक रजेचे पैसे आणि वेतनवाढीतील फरक अद्याप न मिळाल्याने या हक्काच्या देणीपासून ७ हजार ५०० निवृत्त एसटी कर्मचारी वंचित राहिले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला असून त्यांच्या वारसांनाही याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि वारस एसटी मुख्यालय तसेच त्या-त्या एसटी विभागात हक्काची देणी मिळवण्यासाठी खेटे मारत आहेत.
गेल्या वर्षी संपाआधी राज्यात एसटीचे एक लाख कर्मचारी होते. वर्षाला हजारो कर्मचारी निवृत्त होतात. निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे व वेतनवाढीतील फरक दिला जातो. ही सर्व देणी २०१८ पर्यत महामंडळाकडून निवृत्त अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या पश्चाात कुटूंबियांना मिळत होती. परंतु २०१९ पासून हे पैसे देण्यात आले नाहीत. २०१९, २०२० आणि २०२१ पर्यंत जवळपास ७ हजार ५०० एसटी कर्मचारी निवृत्त झाले. हे सर्व कर्मचारी या रक्कमेपासून वंचितच आहेत. ग्रॅच्युईटी तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु मागील पाच वर्षात वेतनवाढ झाल्यानंतर फरकाची रक्कम आणि शिल्लक रजेचे पैसे निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. अशी एकूण रक्कम साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत आहे. काही निवृत्त अधिकाऱ्यांचे एकूण आठ ते दहा लाख रुपये, तर काही कर्मचाऱ्यांची रक्कम ही चार लाख रुपयांपर्यंत आहे. अशा निवृत्त झालेल्या ७ हजार ५०० हजार कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५०० कर्मचाऱ्यांचा तर विविध कारणांमुळे मृत्यूही झाला. तरीही त्यांचे वारसही यापासून वंचित राहिले आहेत.
निवृत्तीनंतरही अवहेलना होणे हे दुर्दैवी –
“ निवृत्त एसटी अधिकारी व कर्मचारी हे संघटित नसल्याने त्याचा गैरफायदा एसटी प्रशासन घेत आहे. निवृत्ती नंतरची देणी तत्काळ द्यावीत, असे परिपत्रक असताना सुद्धा देणी न देणे हे अन्यायकारक आहे. कर्मचारी जिवंत असतानाही त्याला देणी मिळालेली नाहीत. त्यातील काही जण मृत्यू पावले असून त्यांना देणी मिळाली असती तर त्यांचा औषधोपचार व इतर कामासाठी वापर करता आला असता. निवृत्तीनंतरही अवहेलना होणे हे दुर्दैवी आहे.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
सरकारकडून निधी मिळाला आणि प्रवासी उत्पन्न तिजोरीत पडले की… –
अधिकारी, कर्मचाऱ्याना ग्रॅच्युईटी तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम निवृत्तीनंतर मिळत आहेत. काही अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचे पैसे आणि वेतनवाढीतील फरक मिळालेला नाही ही बाब खरी आहे. परंतु ती देणी देण्यासाठी सरकारकडून निधी मिळाला तसेच प्रवासी उत्पन्न तिजोरीत पडले की, तसतशी निवृत्त कर्मचाऱ्यांना ही देणीसुद्धा देत आहोत. असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले आहेत.