अहिल्यानगरः जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातून सध्या सरासरी ७७ टक्के जलसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळांची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतून पाणीसाठा असला तरी लाभक्षेत्रात पाण्याची आस निर्माण झाली आहे. त्यामुळे महिनाभरातच पुन्हा आवर्तनाची मागणी होत आहे.
गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा भंडारदरा, निळवंडे व मुळा या मोठ्या व सहा मध्यम प्रकल्पांत ५१ हजार ९३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी केवळ ५४ टक्के म्हणजे २७ हजार ७५५ दशलक्ष घनफूट साठा होता. यंदा सर्व प्रकल्पांत ७७ टक्के म्हणजे ३९ हजार ३७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.
मुळा धरणात ७६.४० टक्के, भंडारदरा धरणात ९५.७७ टक्के तर निळवंडे धरणात ५६.४२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी धरणांतील साठ्यात घट झाल्याने जानेवारीतच टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली होती. बहुतांश तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले होते. यंदा धरणांत साठा असल्याने उन्हाळ्यातही पाण्याची फारशी तीव्रता जाणवणार नसल्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला होता. पाथर्डी, अहिल्यानगर, कर्जत, पारनेर, जामखेड या तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु होते. यंदा तुलनेत परिस्थिती चांगली असली तरी जिल्हा प्रशासनाने टंचाई निर्मूलन कृती आराखडा ४४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित केला आहे.
धरणांतील पाणीसाठा (दलघफू. मध्ये) पुढीलप्रमाणे:भंडारदार- २०५७२, मुळा- १९८६५, निळवंडे- ४६९४, आढळा- ८६१, मांडओहळ- २३७, पारगाव घाटशिळ-२४०, सीना- १८१०, खैरी- ३४०, विसापूर- ५३७.