नाशिक जिह्य़ातील काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा व गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर व दारणा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून यंदाच्या हंगामात प्रथमच सर्वाधिक म्हणजे तब्बल २१ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. संततधार सुरू असल्याने ही पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील धरणांमधून औरंगाबादच्या जायकवाडी धरणासाठी गुरूवारी सकाळपर्यंत ८,७०० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
गुरूवारी दिवसभर पावसाची तीव्रता कायम होती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून तब्बल ७००० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. यामुळे शहरातून मार्गस्थ होणारी गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे विसर्गाचे हे प्रमाण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त दारणा धरणातून १०७१२ पालखेड ४३७, वालदेवी ५९९, कडवा धरणातून ४६७४ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. गंगापूर व दारणा धरणातील पाण्यामुळे नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील विसर्ग सायंकाळी २१,०३१ क्युसेक्सवर पोहोचला. दरम्यान, पाण्यावरून औरंगाबाद विरुद्ध नगर आणि नाशिक यांच्यात चाललेला संघर्ष मुसळधार पावसाने काहीसा शमणार आहे. जिह्य़ातील धरणांमधून जायकवाडीसाठी आतापर्यंत ८.७ टीएमसी म्हणजेच ८,७०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. गुरूवारी दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्याने हे प्रमाण पुढील काळात आणखी वाढणार आहे.

Story img Loader