पौर्णिमेनिमित्त जोतिबा देवाच्या दर्शनासाठी कोल्हापूरनजीकच्या वाडी रत्नागिरी डोंगरावर निघालेली तब्बल २५ भाविकांनी भरलेली बोलेरो पिकअप जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती उभ्या ट्रकला जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार तर, १७ जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर पेरले (ता. कराड) येथे घडलेल्या या अपघातातील मृत व जखमी शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक, नाणेगाव, खेड तालुक्यातील निगोजे, पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथील आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जण तसेच, दोन महिला व ४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर भाऊ इंगवले (वय ६५), अनिता ज्ञानेश्वर इंगवले (वय ४८), अमर ज्ञानेश्वर इंगवले (वय ३८), आकाश ज्ञानेश्वर इंगवले (वय ३५) अशा एकाच कुटुंबातील चार जणांबरोबरच शिवराज शिवाजी येळवंडे हा ४ वर्षांचा मुलगा तसेच, अशोक भाऊ उमप (वय ४०) आणि बबुताई श्रीपती कापसे (वय ५५) असे ७ जण जागीच ठार झाले. तर, कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान, उज्ज्वला नथू पहाड (वय ४२, रा. पहाडवाडी, ता. शिरूर) यांचे निधन झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
महामार्गावरील उंब्रज नजीकच्या पेरले येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महामार्गाकडेला थांबलेल्या मालट्रकवर पुण्याहून कोल्हापूरला देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन चाललेली बलेरो पिकअप जीप (एमएच १२ के.पी. ३९३) ही जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने जोराची धडकली. त्यात जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. चालकासह त्याच्या शेजारी बसलेले दोघे व मागील बाजूस बसलेल्या सुमारे २२ जणांपैकी चार जण असे सात जण जागीच ठार झाले. तर, १७ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले. जीपच्या पाठीमागील बाजूस फळय़ा टाकून बसण्यासाठी केलेल्या टप्प्यावर पुरुष बसले होते. तर, खालील बाजूस महिला व लहान मुले बसली होती. जीप वेगाने धडकल्याने प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. वनिता वाढे, सुनीता येळवंडे, कविता येळवंडे, विराज येळवंडे, सारिका ऊर्फ नंदा इंगवले, ऐश्वर्या इंगवले, तन्मय इंगवले, पुष्पा इंगवले, शंतनू इंगवले, पायल इंगवले, संजय चतूर, स्वाती चतूर, वैभव चतूर, वैष्णवी चतूर, रघुनाथ ऊर्फ नथू पहाड, अक्षय उमप असे अपघातात १७ जण जखमी झाल्याचे उंब्रज पोलिसांनी सांगितले.
अपघातात बोलेरो जीपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याने गॅस कटरने पत्रा कापून व क्रेनच्या साहाय्याने जीपचा काही भाग ओढून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एकच आक्रोश सुरू राहिल्याने घटनास्थळी सुन्न करणारे वातावरण राहिले होते. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी सतर्कतेने बचाव यंत्रणा राबवली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक मितेश घट्टे-पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. अपघाताची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास एम. के. पाटील हे करीत आहेत.
भाविकांची जीप उभ्या ट्रकला धडकून ८ ठार, १७ जखमी
पौर्णिमेनिमित्त जोतिबा देवाच्या दर्शनासाठी कोल्हापूरनजीकच्या वाडी रत्नागिरी डोंगरावर निघालेली तब्बल २५ भाविकांनी भरलेली बोलेरो पिकअप जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती उभ्या ट्रकला जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार तर, १७ जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
First published on: 14-06-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 votary died in road accident