डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये एका आठ वर्षीय मुलीवर तिच्या क्लासच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बाजारपेठ पोलिसांनी शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली आहे. पत्नी माहेरी गेल्याने मुदर हा पीडित मुलीचा क्लास घ्यायचा. तब्बल दीड महिन्यांपासून तो नराधम या चिमुकलीवर सातत्याने अत्याचार करत होता. यापूर्वी, डोंबिवलीच्या भोपर परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने राज्याला हादरवलं.

राज्यात एकापाठोपाठ एक सातत्याने समोर येणाऱ्या महिला अत्याचाराच्या या प्रकरणांमुळे आता भाजपा ठाकरे सरकारच्या विरोधात आक्रमक झाला आहे. कल्याणमधील या घटनेनंतर पुन्हा एकदा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “डोंबिवली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सर्वज्ञानी संजय राऊत रोज राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत पण तुम्हाला काळजी सरकार ५ वर्ष टिकण्याची आहे. बाकी या घटनांची तुमच्यालेखी किंमत शून्य”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. वाघ यांनी यावेळी ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

आरोपींना आमच्या ताब्यात द्या!

डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या,आम्ही त्यांची धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली होती. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्या सह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.

Story img Loader