दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या जालना शहरात बाराशेपेक्षा जास्त टँकर धावत असून, पाण्याची रोजची उलाढाल ८० लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. खासगी पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.
सहा व दहा टायर असलेले मोठे टँकर, ट्रॅक्टरवरील टँकर, लोडिंग रिक्षा व प्रवासी रिक्षांवर बसविलेल्या टाक्यांमधून दररोज शहरात पाणीविक्री होते. पाण्याच्या या उलाढालीविषयी उघडपणे कोणी बोलत नाही, पण खासगीत चर्चा केल्यानंतर शहरातील भीषण वस्तुस्थिती स्पष्ट होते. ५०० लीटर ते ५००० लीटरदरम्यान क्षमता असणाऱ्या टाक्यांमधील पाणीविक्री प्रामुख्याने जालना शहरातच, घरगुती वापरासाठीच होते. एक हजार लीटर टाकीचा दर ५०० रुपये आहे. उद्योग, रुग्णालये व हॉटेल्सना पाणीपुरवठा करणारे २४ हजार लीटर क्षमतेचे २० आणि १२ हजार लीटर क्षमतेचे जवळपास १०० टँकर पाणीविक्री व्यवसायात आहेत. २४ हजार लीटरचे २० टँकर दररोज पाच फेऱ्या करतात आणि त्यांचा दर प्रतिटँकर ६ हजार रुपयांच्या आसपास आहे. १२ हजार लीटरचे टँकरही प्रतिदिन पाच फेऱ्या करतात आणि त्यांचा दर प्रतिटँकर ४ हजार रुपये असा आहे. मोठय़ा टँकरमधून दररोज साधारणत: २५ लाखांची पाणीविक्री होत असल्याचा अंदाज आहे.
टँकरचालकांना खासगी विहिरींवरून पाणी भरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ६ हजार लीटरचा एक टँकर भरण्यासाठी दीड-दोन हजार रुपये, तर ४ हजार लीटरच्या टँकर भरून घेण्यासाठी एक हजार रुपये लागतात. २ हजार लीटरची टाकी ३०० रुपयांना, तर १ हजार लीटरची टाकी भरण्यासाठी १५० रुपये मागितले जातात. ऑटोरिक्षावर बसविलेली ५०० लीटरची टाकी भरण्यासाठी १०० रुपयांपर्यंतची मागणी केली जाते.
बाटलीबंद किंवा पाऊचमधील पाणीविक्रीचा व्यवसायही शहरात वाढला आहे. हा व्यवसाय करणारे ७-८ उद्योजक असून, २५ हजारांपेक्षा अधिक बाटल्यांची विक्री सध्या होते. घरगुती वापरासाठी ४० लीटर क्षमतेच्या प्रत्येकी ५० रुपयांच्या जारची खरेदी केली जाते. जवळपास ७ हजार जारची दररोज विक्री होते. दोन रुपये किमतीच्या २००-२५० मिलिलीटर पाऊचची दररोज लाखांपेक्षा अधिक विक्री होत असल्याचा अंदाज आहे.
जालन्यात दररोज ८० लाख पाण्यात!
दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या जालना शहरात बाराशेपेक्षा जास्त टँकर धावत असून, पाण्याची रोजची उलाढाल ८० लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. खासगी पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. सहा व दहा टायर असलेले मोठे टँकर, ट्रॅक्टरवरील टँकर, लोडिंग रिक्षा व प्रवासी रिक्षांवर बसविलेल्या टाक्यांमधून दररोज शहरात पाणीविक्री होते.
First published on: 15-03-2013 at 05:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 lakh rs water from tanker sold everyday at jalna