सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मघा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्य़ातील पावसामुळे उजनी धरणात भरणाऱ्या पाणीसाठय़ाची वाटचाल ८० टक्क्य़ांपर्यंत झाली आहे.
शनिवारी सायंकाळी उजनी धरणात ७७.९२ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. त्यात आणखी भर पडत आहे. सायंकाळी सहापर्यंत या धरणातील पाण्याची पातळी ४९५. ८६ मीटर इतकी होती, तर एकूण पाणीसाठा २९८५.०८ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाणीसाठा ११८२.२० दलघमी इतका होता. पुण्यातील बंडगार्डनमधून उजनी धरणासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४८९२ क्युसेक्स होता. तर दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग १८ हजार ८७९ क्युसेक्स एवढा होता. गेल्या जुलै महिन्यातील पहिल्या दहा तारखेपर्यंत उजनी धरणातील पाण्याचा साठा वजा २८ टक्क्य़ांपर्यंत खाली गेला होता. तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्य़ात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे पुन्हा दुष्काळाच्या भीतीने शेतक-यांची गाळण उडाली होती. तथापि, त्यानंतर पुणे जिल्ह्य़ात सुदैवाने दमदार पावसाला प्रारंभ झाला आणि इकडे सोलापूरच्या भाग्यदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणात पाणीसाठा वाढत गेला.
जिल्ह्य़ात गेले दोन-अडीच महिने पावसाने दगा दिला असताना यंदाच्या मघा नक्षत्राने मात्र चांगलाच दिलासा देत सर्वानाच सुखावले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सार्वत्रिक स्वरूपात दूरवर पाऊस पडत आहे. सुखद आश्चर्य म्हणजे एरव्ही सदैव दुष्काळाचा शिक्का बसलेल्या सांगोला व मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक पाऊस होऊन तेथील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढू लागली आहे.
या दमदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात सरासरी ३०६.२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत सरासरी ३०७ मिमी पाऊस झाला होता. म्हणजे गतवर्षीच्या पावसाची सरासरी जवळपास गाठण्यात आली आहे. तालुकानिहाय शनिवारी सकाळी २४ तासात पडलेल्या आणि एकूण पावसाची आकडेवारी अशी: (कंसातील आकडे आतापर्यंत पडलेल्या पावसाचे आहेत.) सांगोला-२४.८६ (४१८.०८), मंगळवेढा-२९.९६ (३१८.७२), उत्तर सोलापूर-६७.६५ (३३०.९३), दक्षिण सोलापूर-४८.२ (२९६.५२), अक्कलकोट-४३.७८ (३२८.१८), पंढरपूर-४२.८८ (२८३.४९), बार्शी-७.५४ (२८२.१७), माढा-१२.४८ (२६०.१९), मोहोळ-४६.४६ (२७५.९), करमाळा-१०.७५ (३००.५५) व माळशिरस-२२.१० (२७३.४८). या पावसामुळे जिल्ह्य़ातील टंचाईग्रस्त परिस्थिती संपुष्टात येण्यात जमा आहे.
उजनी धरण ८० टक्क्य़ांच्या घरात
सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मघा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला
First published on: 31-08-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 percent water stock in ujani dam