सोलापूर : सोलापुरात करोना संसर्गाने पुन्हा तोंड वर काढायला सुरूवात केली असून मंगळवारी एका ८० वर्षांच्या वृध्द महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. तर ८नवे रूग्ण आढळून आले. सध्या करोनाबाधित १५ रूग्ण सक्रिय आहेत. रेल्वे लाईन्स भागातील बुबणे चाळीत राहणाऱ्या एका ८० वर्षांच्या वृध्द महिलेला दमा आणि पक्ष्याघाताच्या आजारामुळे एका खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते.
हेही वाचा >>> “ईडीची टीम दारात आल्यावर हसन मुश्रीफ…” समरजित घाटगेंचा गौप्यस्फोट, म्हणाले, “तब्बल ५२ तास…”
नंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, तिची करोना चाचणी करण्यात आली होती. यात ती करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, मंगळवारी १२८ संशयित रूग्णांची करोना चाचणी करण्यात आली असता त्यापैकी ८ रूग्ण करोनाबाधित आढळून आले. यात तीन पुरूष तर पाच महिलांचा समावेश आहे. सध्या शहरात १५ करोनाबाधित वैद्यकीय उपचाराधीन आहेत. मागील १५ दिवसांपासून करोना रूग्ण आढळून येत आहेत. ताप, खोकला, दमा, श्वसनाचा त्रास असलेल्या रूग्णांची संख्या वाढत असून बहुसंख्य रूग्णालयांमध्ये रूग्ण वाढले आहेत.