वाई: पुणे बंगळुरू महामार्गावर बोपेगाव (ता. वाई) गावच्या हद्दीतील हॉटेलसमोर जेवणासाठी थांबलेल्या आराम बसमधून प्रवाशाचे ९६ लाख रुपयांची बॅग पळविणाऱ्या दोन इसमांना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून भुईंज पोलिसांनी ८३ लाख रुपये हस्तगत केल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे उपस्थित होते.

पुणे बंगळुरू महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपेगाव (ता वाई ) येथील हॉटेल समोर एक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (स्लीपर कोच) जेवणासाठी थांबलेली असताना या बसमधून ९६ लाख रुपये रोख रक्कम आपल्या सामानातून घेऊन जाणारे प्रवासी जेवणासाठी खाली उतरले होते. त्याचा फायदा घेऊन दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या सामानातील पैशाची बॅग चोरून नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात चोरीस गेलेली रक्कम मोठी असल्याने सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंजचे एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यामध्ये दोन संशयित इसमांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या, यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हसन जुमान मोहम्मद, भवानीगड, महाराजगंज रायबरेली, इस्तियाक जान मोहम्मद पडरिया, महाराजगंज रायबरेली उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली ८३ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

हेही वाचा – भाजपला उमेदवार मिळत नसल्याने पक्ष फोडतात – जितेंद्र आव्हाड

हेही वाचा – मोदींनी जुमल्याचे नावच ‘मोदी की गॅरंटी’ केले, यवतमाळात उद्धव ठाकरे बरसले

गुन्ह्यातील तीसरा आरोपी सदर ट्रॅव्हल्सचा क्लिनर याचा शोध सुरु आहे. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल भंडारे, उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकल, आदी अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. संशयीतांचा कोणताही धागा दोरा नसताना तांत्रिक कौशल्याचा वापर करत सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मागील एक वर्षात भुईज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने खुनाचे, जबरी चोरीचे, घरफोडीचे, डिपी चोरीचे, दुचाकी चोरीचे ३५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Story img Loader