शेतक-याच्या मालाची थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी कृषी खात्याच्या पुढाकारातून जिल्हय़ात शेतक-याच्या ९ खासगी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. आणखी ५ कंपन्यांची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या जून-जुलैमध्ये या ९ कंपन्या शेतीमालाचे ग्रेडिंग व पॅकिंग करून थेट बाजारपेठेत उतरतील. या कंपन्यांना जागतिक बँकेकडूनही अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे.
कृषीच्या आत्माचे प्रकल्प संचालक संभाजी गायकवाड यांनी ही माहिती दिली. या सर्व कंपन्या कंपनी अॅक्टनुसार नोंदणी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कंपनीचे किमान ३०० ते ४०० शेतकरी सभासद आहेत. या सभासदांकडून भागभांडवल जमा करण्यात आले आहे व अध्यक्ष, संचालक मंडळाची निवड करण्यात आली आहे.
धान्य, फळे, भाजीपाला असा शेतमाल थेट शेतक-याकडून विकत घेऊन त्याचे ग्रेडिंग व पॅकिंग करून तो बाजारपेठेत विक्रीस आणला जाणार आहे. या कंपन्यांच्या प्रकल्पासाठी कृषी विभागाने आर्थिक साहाय्यही देऊ केले आहे. प्रत्येक कंपनीच्या कार्यक्षेत्रात किमान २५ लाखाचे सामूहिक सुविधा केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रासाठी या ९ कंपन्यांनी १० ते २० गुंठे जागाही घेतली आहे. अन्नधान्याच्या प्रकल्पासाठी ७ लाख ५० हजार रु. व फळपिकासाठी ४ लाख ५० हजार रुपयांची मदत कृषी विभाग देणार आहे.
गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनी (अन्नधान्य व कांदा ग्रेडिंग, वांबोरी), दत्तकृपा कंपनी (अन्नधान्य व दाळमिल, वाघोली), आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी (तुरीच्या शेंगा, लिंबू लोणचे व ज्यूस प्रक्रिया, पिंप्री लौकी, राहाता), ग्रामोदय कंपनी (पेरू ग्रेडिंग व पॅकिंग, राहाता), फार्मसीस कंपनी (अन्नधान्य व मूग डाळ प्रक्रिया, पिंप्री गौळी), अमरसिंह फार्मर्स कंपनी (डाळिंब ग्रेडिंग, पॅकिंग व विक्री, मका खरेदी कर्जत), माऊली शेतकरी उत्पादक कंपनी (डाळिंब व लिंबू ग्रेडिंग, पॅकिंग व विक्री), ज्ञानदीप शेतकरी उत्पादक कंपनी (नैसर्गिकरीत्या केळी पिकवणे, कुकाणा), जाणता राजा शिवबा शेतकरी उत्पादक कंपनी (अन्नधान्य ग्रेडिंग, पॅकिंग व सोयाबीन बीजप्रक्रिया) या ९ कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.
कंपन्यांचे व्यवसाय आराखडे तयार करण्यासाठी आत्माच्या वतीने नुकतीच म. फुले कृषी विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी अनेक तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेत शेतकरी कंपन्यांचे अध्यक्ष गंगाधर चिंधे, विठ्ठल पिसाळ, संतोष खंडागळे, योगेश थोरात, दिलीप लावरे, मनोज सदाफळ, अशोक दातीर आदी उपस्थित होते. कृषी व पणनतज्ज्ञ रावसाहेब बेंद्रे यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा