लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : दोन वर्षापूर्वी लागेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणायासाठी राज्यसरकारने तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या मान्यतेनंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अलिबागकरांसाठी नाटकांची तिसरी घंटा लवकरच वाजण्याची शक्यता आहे.

२०१७ मध्ये शासनाच्या अनुदानातून राज्यातील पहिले सहकारी तत्वावर चालविण्यात येणारे नाट्यगृह अलिबागकरांच्या सेवेत दाखल झाले होते. त्यामुळे अलिबागच्या नाट्य आणि सांस्कतीक चळवळीला उर्जितावस्ता आली होती. मात्र १५ जून २०२२ ला नाट्यगृहाला भिषण आग लागली आणि संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले होते. नाट्यगृहात वेल्डींगचे काम करत असतांना ठिणगी पडून ही आग लागली होती. त्यामुळे अलिबागच्या नाट्य चळवळीला मोठा धक्का बसला होता.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांचा मृत्यू… ”

रायगडचे जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून नाट्यगृहाच्या पुनश्च उभारणीसाठी तसेच दुरुस्तीसाठी निधी मिळावा याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवला होता. त्यास मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर मंजूरी देण्यात आली असून, निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पिएनपी नाट्यगृहाच्या दुरस्ती आणि नुतनीकऱणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा निधी मंजूर करतांना शासनाने काही अटी घातल्या आहेत. निधी प्राप्त झाल्यापासून दोन वर्षाच्या आत नाट्यगृहाचे काम पुर्ण करायचे आहे. भविष्यात नाट्यगृहाच्या प्रयोजनासाठी पुन्हा निधीची मागणी करता येणार नाही. नाट्यगृहात भविष्यात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाट्यगृह सांस्कृतिक कार्य विभागासाठी दरवर्षी सलग दहा दिवस अथवा टप्प्याटप्याने विनामोबदला उपलब्ध करून द्यावे लागेल. त्याच बरोबर नाट्य गृहाचा विमा काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे निर्देशही शासन निर्णयानुसार पिएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाला देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 crore 32 lakhs funds for pnp theatre at alibaug mrj