लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दुष्काळ मदत निधीतून २ कोटी ४३ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून अपहारातील ९० लाख रूपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी दिला जाणारा मदत निधी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वितरित केला जातो. एखाद्या शेतकर्याचे बँक खाते जिल्हा बँकेत नसेल तर तो निधी अनामत खात्यावर कायम राहतो. याच खात्यातून तासगाव तालुक्यातील ४, जत व आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा शाखामध्ये अपहार झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी आठ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अपहाराची रक्कम वसुल करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. आतापर्यंत अपहारातील ९० लाख रूपये वसुल करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-सोलापुरात रोहिणीचा पहिलाच २५ मिमी पाऊस; वादळाने वृक्ष कोसळले; फळबागांसह घरांचेही नुकसान
दरम्यान, अपहार करणार्याविरूध्द कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शाखाधिकार्यांनी रोजमेळ झाल्याविना बँकेतून बाहेर पडायचे नाही अशा सक्त सूचना देण्यात आल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.
दरम्यान, बँकेत अपहार करणार्याविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे. तर नागरीक जागृत मंचचे सतीश साखळकर यांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. अपहाराची रक्कम सहा ते सात कोटीपर्यंत असण्याची शक्यता असून केवळ फौजदारी अथवा दिवाणी कारवाई करण्याऐवजी सर्वच शाखांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी केली आहे.