वडील पारंपरिक पोतराज, राहण्यास धड घर नाही, शिक्षणाचा तर वारसाच नाही.. पोराने मात्र नाव काढले! मागच्या पिढय़ांची दैना फेडण्याची ऊर्मी आता तो बाळगून आहे. दहावीच्या निकालाने शहरात मंगळवारी तोच चर्चेचा विषय बनून राहिला आहे.
दामोधर दुर्गाप्पा पवार असे या प्रज्ञावंताचे नाव. दहावीच्या परीक्षेत तो तब्बल ९० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. कोणतीही शिकवणी अथवा अवांतर मार्गदर्शनाशिवाय त्याने हे यश मिळवले, तो शहरात कौतुकाचा विषय बनला आहे. येथील समर्थ शाळेत दामोधर पहिला आला.
दामोधर हा हिंदू मरीआई जमातीचा आहे. पोतराज हा या लोकांचा पारंपरिक व्यवसाय, वडील दुर्गाप्पा हेच काम करतात. दामोधरने तेच करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र तो हट्टाने शिकला, कष्टाने अभ्यास केला. आता तो ९० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आहे. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. आर्थिकदृष्टय़ा विचार केला तर अठराविश्व दारिद्र्य म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. शिक्षणाचा तर घरात लवलेशही नाही. राहण्यास धड घरही नाही. झोपडीवजा पालात कुटुंबासमवेत दामोधर राहतो. पोतराजाचे खेळ करीत वडील गावोगाव भटकंती करतात. याही परिस्थितीत दामोधर शिकला, शाळेच्या अभ्यासिकेचाच त्याला आधार होता. तिथेच मन लावून अभ्यास करून त्याने शालान्त परीक्षेत मोठे यश मिळवले. शाळेचे मुख्याध्यापक युसूफ शेख व संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही त्याला लाभले. इंजिनिअर होण्याची मनीषा तो बाळगून आहे. या यशाबद्दल दिवसभर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता.

Story img Loader