रत्नागिरी : जिल्ह्याच्या दापोली तसेच रत्नागिरी तालुक्यातील समुद्र किना-यांवर मोठ्या प्रमाणात कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यासाठी संरक्षक केंद्रे उभारण्यात येत आहेत. रत्नागिरीतील गावखडी येथील समुद्र किना-यावर संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ९०३ कासवांच्या पिल्लांनी समुद्रात झेप घेतली आहे.

रत्नागिरीतील गणपतीपूळे पाठोपाठ यावर्षी गावखडी समुद्र किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडली आहेत.  ती घरटी संरक्षित करण्याचे काम येथील प्राणीप्रेमींनी केले आहे.  याठिकाणी संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यांतील अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने ९०३ पिल्लांनी समुद्राकडे झेप घेतली आहे.

गावखडी किनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर अनेक पर्यटकांना पिल्ले समुद्रात जातानाचा एक वेगळा  क्षण अनुभवायला मिळत आहे. गेली अनेक वर्षे या किनाऱ्यावर कासवाच्या घरट्यांचे संवर्धनाचे काम प्राणीमित्र व वनविभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे पर्यटकांची ही संख्या या किना-यावर वाढत आहे.

सध्या टप्प्याटप्प्याने कासवे गावखडी येथील समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत. गेल्या दोन दिवसात १६ घरटी तयार झाली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.  या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत फक्त गावखडी समुद्रकिनाऱ्यावर १२९ घरटी सापडली आहेत. त्यामध्ये १३ हजार ४०३ अंडी आहेत. त्यातील ९०३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे. उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांनाही टप्प्या टप्प्याने  समुद्रात सोडण्यात येणार आहेत.