कोल्हापूर विभागाने बारावीच्या निकालात प्रथमच सरासरी नव्वदीची पायरी ओलांडली. या विभागात ९१.५४ टक्के इतका निकाल लागला असून, तो आजवरच्या इतिहासात विक्रमी मानला जात आहे. उत्तीर्णाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये सोमवारी दिवसभर ‘अच्छे दिन आये’चा माहोल होता. निकालाची टक्केवारी प्रतिवर्षीपेक्षा वाढल्याने यंदा प्रवेशाची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदाही अपेक्षेप्रमाणे मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली. तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात अनुक्रमे कोल्हापूर जिल्हा (९२.२०), सातारा (९१.२६) व सांगली (९०.९१) यांचे स्थान राहिले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी/मार्च २०१४ च्या बारावी परीक्षेचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. १० जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून महाविद्यालयात गुणपत्रके विद्यार्थ्यांना वाटली जाणार असल्याची माहिती विभागीय सचिव शरद गोसावी यांनी दिली.
कोल्हापूर विभागाच्या यंदाच्या निकालात गतवर्षीपेक्षा ७.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात मुलींनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. एकूण ९६.२३ टक्के मुली तर ८७.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. एकूण ६३ हजार ८३५ मुले परीक्षेस बसली होती. पकी ५६ हजार ५० जण उत्तीर्ण झाले. तर ५० हजार ७६८ मुलींपकी ४८ हजार ७५६ मुली उत्तीर्ण झाल्या.
कोल्हापूर विभागातील ५८३ महाविद्यालयाचे एकूण १ लाख १४ हजार ७७६ पकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४८ हजार ८६५ मुली तर ५६ हजार मुले होती. जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये ४६ हजार ३३६ विद्यार्थी होते. पकी ४६ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले तर ४२ हजार ६४८ विद्यार्थी पास झाले. यामध्ये मुले २२ हजार ९४५ तर मुली १९ हजार ७०३ होत्या.
यंदाच्या परीक्षेत गरप्रकार करणाऱ्या ६० विद्यार्थ्यांना २ वर्षांसाठी परीक्षेस प्रतिबंध करण्यात आला आहे. तर ३ तोतया विद्यार्थ्यांना ६ वर्षे परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच उत्तरपत्रिकेचे फोटो कॉपी पूर्ण पडताळणीसाठी २० जूनपर्यंत मुदत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी कोल्हापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष भि. वा. कांबळे, सहसचिव पी. बी. भंडारे, सहायक सचिव बी. एस. शेटे आदी उपस्थित होते.