सोलापूर : शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळेल, अशी भुरळ पाडून आपल्याच नात्यातील एका व्यावसायिकाला ९१ लाख रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघा भावांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकलूज येथे हा प्रकार घडला.याबाबत आकाश अधिकराव मुंजाळ (वय ३६, रा. अकलूज) यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज चंद्रकांत पवार (वय ३०) आणि त्याचा भाऊ रूपेश पवार (वय ३३, रा. अकलूज) यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. १ आॕक्टोंबर २०२१ ते १५ मे २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. आकाश मुंजाळ हे अकलूजमध्ये प्रगती वाॕठर इंजिनियरिंग या नावाने व्यवसाय करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज पवार हा त्यांच्या मामाचा जावई आहे. या नातेसंबंधातून नेहमीच होणा-या भेटीगाठीतून पवार बंधुंनी आकाश मुंजाळ यांना, तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास दरवर्षी १० टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून गुंतवणुकीची पध्दत समजावून सांगितली. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मुंजाळ यांनी वेळोवेळी मिळून एकूण ९१ लाखांची रक्कम पवार बंधुंच्या बँक खात्यावर भरली. त्यास वर्ष लोटले. परंतु ठरल्याप्रमातृ १० टक्के नफा मिळत नसल्यामुळे त्यांनी पवार बंधुंशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी  सुरूवातीला थापा मारल्या. नंतर भेटणे टाळू लागले.दरम्यान, रूपेश पवार याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद होते. त्याने कुटुंबीयांसह पुण्यात कोठे तरी राहात असल्याचे समजले. तर मनोज पवार याने आपण परदेशात असून अकलूजमध्ये परतल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम नफ्यासह परत करू, अशी थाप मारली. नंतर मात्र त्यांचा संपर्क तुटला. यात फसवणूक झाल्यामुळे मुंजाळ यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस पवार बंधुंचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 91 lakhs by attracting high profits from investments in the market solhapur amy
Show comments